Kranti Redkar On Her Diet: अभिनेत्री क्रांती रेडकर ही अनेकदा सोशल मीडियावरील तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या आयुष्यात घडणारे किस्से, तिच्या मुलींचे किस्से गोष्टींच्या स्वरूपात सांगत असते, त्यामुळे तिची मोठी चर्चा होताना दिसते.

क्रांती रेडकर फिट राहण्यासाठी करते ‘असे’ डाएट

क्रांती रेडकरने नुकतीच सोनाली खरेच्या यूट्यूब चॅनेलवर हजेरी लावली होती. यावेळी तिने तिचे डाएट काय असते, ती कधी जेवण करते यावर वक्तव्य केले. डाएटबाबत क्रांती म्हणाली, “मी सगळं खाते. मी मालवणी आहे. मी माशाच्या कढीबरोबर भात खातेच. पण, मी सगळं थोडं थोडं खाते. मी समोसे, जिलेबी सगळं खाते. मात्र, मी हे सगळं कमी प्रमाणात खाते.

मी सूर्यास्तानंतर मी खात नाही. सूर्योदय झाल्यानंतर मी बिनासाखरेची कॉफी पिते. ११ नंतर मी जेवण करते, त्यानंतर २ वाजता मी जेवते व साडे पाचला मी काहीतरी खाते.”

तसेच व्यायामाबाबत क्रांती म्हणाली की, मी दररोज योगासने करते. गरोदरपणात मला बेडरेस्ट सांगितली होती. मी रोज आईच्या हातचं चविष्ट जेवण करत होते, त्यावेळी माझं वजन ९२ किलो झालं होतं. त्याआधी माझं वजन कायम ५६ किलो होतं. मला कायमच तंदुरुस्त राहायला आवडतं. मुलींच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी मी चालायला सुरुवात केली. सहा महिन्यांनंतर मी योगासने करायला सुरुवात केली. असं करत मी थोडं थोडं वजन कमी केलं. पुढे अभिनेत्री असेही म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये मी खूप व्यायाम केला, त्यावेळी एकदम फिट झाले होते.

मुलांच्या आरोग्यासाठी आहाराबाबत काय काळजी घेते? यावर क्रांती म्हणाली की, माझ्या मुलींना पिझ्झा, बर्गर हे आवडत नाही. जरी त्यांना पिझ्झा, बर्गर खावा वाटला तरी मी त्यांना घरी बनवून घेते. माझी कूक अप्रतिम बर्गर बनवते. त्यांच्या जेवणात आमटी, भात, भाजी, चिकन असे पदार्थ असतात. माझ्या मुलींना भाज्या प्रचंड आवडतात. त्यांनी भाज्या खाण्यासाठी कधीच नखरे केले नाहीत. त्यांना सॅलेड खायला आवडतात. याबरोबरच अभिनेत्रीच्या मुली तायक्वांदो शिकत असून त्या स्केटिंगचे प्रशिक्षणदेखील घेणार असल्याचे सांगितले.

याबरोबरच क्रांतीने नामस्मरणाबद्दलदेखील वक्तव्य केले. क्रांती म्हणाली की, माझ्या वडिलांकडून मला सगळ्यात मोठी भेट ही नामस्मरणाची मिळालेली आहे. माझ्याकडे एक माळ आहे, ती मी दिवसभर स्वामींच्या पादुकांवर ठेवते. रात्री मी ती माळ हातात घेते, मग एखादा मंत्र मी १०८ वेळा म्हणते. त्यानंतर ज्या पद्धतीची झोप लागते, त्याची तुलना कशाबरोबरही होऊ शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्रीचे अनेक मराठी चित्रपट गाजले आहेत. अनेकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.