Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Collection : गेल्या आठवड्यात १ तारखेला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून प्रत्येकाच्याच शाळेच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्यानं ताज्या झाल्या आहेत. प्रेक्षकांकडून या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशातच शनिवारी सिनेमानं विक्रमच रचला आहे.
मराठी शाळा आणि मराठी भाषा… यावर आधारित असलेल्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सर्वत्र सिनेमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमानं आठवडाभरात पाच कोटींचा गल्ला पार केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटानं ६.१४ कोटी कमावले आहेत. त्यात ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’साठी कालचा शनिवार (१० जानेवारी) ऐतिहासिक ठरला आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’नं शनिवारी (१० जानेवारी) २.०२ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. Sacnilk नुसार, ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ची पहिल्या आठवड्याची कमाई ही ५.७५ इतकी आहे. सिनेमा रिलीज होऊन १० दिवस झाले आहेत आणि या १० दिवसांची एकूण कमाई ही ७.९ कोटी इतकी आहे.
प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकार, सिनेमाचं संगीत व कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. त्यात सिनेमात मांडलेला मराठी भाषा आणि मराठी शाळेविषयीचा विषय अनेकांना भावला आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांत सिनेमाला हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’नं शनिवारी कमावले…
क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’बद्दल सांगायचं झाल्यास, सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर यांनी आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली आहे; तर अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर व प्राजक्ता कोळी या कलाकारांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. पडणारी शाळा वाचवण्यासाठीचे प्रयत्न या सिनेमातून पाहायला मिळत आहेत.
