Kushaal Badrike On Marathi Cinema Theatre Shows : मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा नव्याने उभारी मिळत आहे. त्यामुळे मराठी सिनेमेही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करीत आहेत. एका वर्षामध्ये दोन मराठी सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. आशयघन सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेविश्वामध्ये जबरदस्त सिनेमे तयार होत आहेत. सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच हॉरर, थ्रिलर आणि विनोदी सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची तुफान कमाई होत असतानाही चित्रपटगृहामध्ये शो मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

एकाच वर्षामध्ये रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा शिवाजी’ आणि प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद २’ या सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला. मराठी प्रेक्षकांनी या सिनेमांना उदंड प्रतिसाद दिला, अगदी महिना उलटून गेल्यानंतरही सिनेमांचे हे शो हाऊसफुल्ल होत होते. उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमांना चांगला प्रतिसाद देऊनही मराठी सिनेमांना महाराष्ट्रामध्ये शोकरिता थिएटर मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हॉलीवूडच्या चित्रपटांना तर अगदी हजारो रुपयांचे तिकीट ठेवून ‘शो’ दिले जात आहेत. मात्र मराठी सिनेमांसाठी शो मिळविण्याकरिता थिएटर मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.

कुशल बद्रिकेने व्यक्त केली नाराजी

सध्या कुशल बद्रिके हा त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमामुळे चर्चेमध्ये आला आहे. कुशलसह सिनेमाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करीत आहे. सिनेमाची निर्मिती आणि त्याच्या प्रमोशनसाठी टीमकडून अथक प्रयत्न केले जात असूनही चित्रपटगृहांमध्ये मात्र शो मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुशल बद्रिकेने महाराष्ट्रात मराठी सिनेमांना शो उपलब्ध होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाला कुशल बद्रिके?

कुशल बद्रिके म्हणाला, “मराठीमध्ये अनेक चांगले सिनेमे येत आहेत. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, सुपर डुपर, घबाडकुंड, तुंबाडची मंजुळा असे अनेक चांगले चित्रपट आले आहेत. आणि हे मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर सलगतेने सुपरहिट ठरत आहेत. सगळे मराठी सिनेमे चांगले चालले आहेत. मराठी प्रेक्षकांना जर सकस विनोद दिला, तर ते थिएटरपर्यंत येतात. प्रेक्षकांना चांगली कलाकृती दिली तर ते १०० टक्के सिनेमा उचलून धरतात; पण जर त्यांना सिनेमा बघण्यासाठी ठिकाणच उपलब्ध होणार नसेल, तर ते तरी काय करणार?”

पुढे तो म्हणाला, “सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना ठिकाणच नसतं हे काही मला पटत नाही. हॉलीवूडच्या सिनेमांसाठी ७५० ते १५०० रुपये तिकटांचा दर लावतात. आणि आम्हाला शोसुद्धा देत नाही. कितीतरी लोकांनी मला अशा प्रकारची समस्या सांगणारे मेसेज केले आहेत. ‘आम्हाला तिकीट बुक करायचं आहे पण शोच दाखवत नाहीये,’ असे प्रेक्षक सांगत असतात,” अशी खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमा प्रदर्शित

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, कुशल बद्रिकेचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कुशलसह अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांची अफलातून केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, अवधूत गुप्ते, मकरंद देशपांडे आणि प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. संत्या, बाबा, कुश्या आणि मामा यांची भन्नाट केमिस्ट्री, त्यांच्या गंमती-जंमती आणि गोव्याचा प्रवास यावर आधारित चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.