Kushal Badrike Lalit Prabhakar Friendship Video : चित्रपट किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या निमित्ताने कलाकार मंडळी सेटवर एकमेकांचे मित्र बनतात. पुढे हीच मैत्री आणखी घट्ट होत जाते. एखाद्या चित्रपट किंवा प्रोजेक्टनिमित्ताने भेटलेले कलाकार पुढे आयुष्यभरासाठी खास मित्र बनतात. असेच आता कुशल बद्रिके आणि ललित प्रभाकर हे अभिनेते एकमेकांचे खास मित्र झाले आहेत.

कुशल आणि ललित यांचा एकत्र ‘सुपर डुपर’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एकमेकांच्या विरोधात असले, तरी खऱ्या आयुष्यात दोघे एकमेकांचे खास मित्र बनले आहेत. ‘सुपर डुपर’ हा दोघांचा तसा पहिलाच चित्रपट आहे. पण या पहिल्या चित्रपटातच दोघे एकमेकांचे खास मित्र बनले आहेत. यांची मैत्री दाखवणारा एक व्हिडीओ नुकताच कुशलने शेअर केला आहे.

कुशल बद्रिके सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो स्वत:चे तसेच पत्नी अन् मित्रांचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. या पोस्टखालील त्याचे कॅप्शन कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अशातच कुशलने ललितचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ललित कुशलचे केस सेट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह कुशलने ललितचं कौतुकदेखील केलं आहे.

Award Banner

कुशल बद्रिकेची ललितसाठी खास पोस्ट

कुशल म्हणतो, “तसं सिनेमात आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे असलो, तरी खऱ्या आयुष्यात मात्र आम्ही दोघेही एकाच पार्टीचे. आता परवाची गोष्ट… एका मुलाखतीला विस्कटलेले केस घेऊन गेलो होतो, तर या पठ्ठ्याने (ललित) चक्क माझे केस सेट करून दिले. शूटिंगला सेटवर स्वतःचा जेवणाचा डब्बा हा सगळ्यांना वाटत फिरायचा. संजय जाधव सरांबरोबर ट्रोलीला उभा रहायचा. ललित अत्यंत मनमिळाऊ, नम्र, प्रेमळ, देखणा, हुशार अभिनेता आहे. तसं मी ललितबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे, पण भारी मज्जा आली. शूटिंगच्या दरम्यान फालतू कोटी करण्यापासून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. ती आता कोटींचा बिझनेस करेल, अशा सिनेमापर्यंत येऊन पोहोचली आहे.”

कुशल बद्रिकेने शेअर केलेला व्हिडीओ

कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीसुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी दोघांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. दरम्यान, ‘सुपर डुपर’ या सिनेमात ललित-कुशलसह निर्मिती सावंत, शशांक शेंडे, ऋषिकेश जोशी, विदुला चौगुले, नम्रता संभेराव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या ३ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.