मराठीसह बॉलीवूडमध्ये आपली ‘लय भारी’ ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश व जिनिलीया देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील ‘आदर्श जोडी’ म्हणून पाहिलं जातं. त्यांना चाहते आपुलकीने महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणतात. गेल्या काही वर्षात रितेशने बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वात सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रितेशचे ‘लय भारी’, ‘माऊली’, ‘वेड’ हे सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्याच्यासह अनेक दमदार कलाकार झळकले होते. लोकप्रिय अभिनेता संजय खापरेने या सिनेमात सखा ही भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजय खापरेने रितेश देशमुख व त्याच्या कुटुंबीयांचं भरभरून कौतुक केलं आहे.
संजय खापरे म्हणतो, “मी रितेश सरांबरोबर ‘लय भारी’ सिनेमाच्या निमित्ताने काम केलं होतं. इतका मोठा माणूस, एवढा मोठा फॅनबेस…बॉलीवूडमध्येही नाव आहे. पण, तो माणूस प्रत्येकाशी आदराने बोलतो. प्रत्येकाला अहो-जाओ अशी आदराने हाक मारतो. मला त्यांचं फार कौतुक वाटतं. मला अजूनही आठवतंय, जेव्हा ‘लय भारी’ सिनेमाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा जिनिलीया मॅडम आमच्यासाठी त्यांच्या घरची बिर्याणी घेऊन आल्या होत्या. बिर्याणी वगैरे बरंच काय-काय त्या घेऊन यायच्या. त्या सगळं त्यांच्या घरून बनवून आणायच्या. मी ते पाहून फार भारावून गेलो होतो. माझं असं झालं ही माणसं किती कौटुंबिक आहेत.”
“आपल्याला वाटतं हे लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जात असतील. पण, असं नाहीये…ते लोक फार साधं-सोपं आयुष्य जगत आहेत. ही खरंच आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. इतकंच नव्हे तर त्या उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. ‘वेड’ सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला त्याची झलक पाहायला मिळाली.” असं संजय खापरेने रितेश-जिनिलीयाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून तो ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमुळे चर्चेत आहे. यंदाही या कार्यक्रमाचा होस्ट म्हणून रितेश जबाबदारी सांभाळणार आहे. याशिवाय त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ सिनेमा यावर्षी १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
