Lalit Prabhakar Namdeo Dhasal Biopic Release Date : ललित प्रभाकरने आतापर्यंत विविध विषयांवर आधारित चित्रपटांत काम केलं आहे. तो कायम चित्रपटांमार्फत काहीतरी नवीन विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच आता ललित पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
ललित प्रभाकर दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटातून झळकणार आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’ निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित झाले. नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची तारीखसुद्धा जाहीर झाली आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चरित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा चरित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘ढसाळ’ या आगामी चरित्रपटात ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेतून झळकणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्याचा चित्रपटातील प्रभावी लूकसुद्धा पाहायला मिळतोय.
दिग्गज संगीतकार इल्लैयाराजा देणार संगीत
संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत वरुणा मदनलाल राणा निर्मित या चरित्रपटात दलित पँथर चळवळीचे प्रणेते, विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा संघर्षमय आणि ज्वलंत जीवनप्रवास यामधून पाहायला मिळणार आहे. वरुणा राणा यांनी या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाला देशातील दिग्गज संगीतकार इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील, तसेच मराठीतील गुरु ठाकूर यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत.
ललितनेसुद्धा सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टला त्याने “सर्वसामान्य माणसाला सत्तासंपत्तिप्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या चळवळींना. प्रवृत्तींना अर्पण. – पद्मश्री नामदेव ढसाळ” अशी कॅप्शन दिली आहे.
ललितच्या या पोस्टखाली मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. अलीकडेच ललित ‘सुपर डुपर’ या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच आता येत्या काळात ललित ‘ढसाळ’ या बहुप्रतिक्षित चरित्रपटातून झळकणार असून यामधील त्याचं काम आणि मोठ्या पडद्यावर नामदेव ढसाळ यांचा ज्वलंत जीवनप्रवास पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.
