Lalit Prabhakar New Film : ‘क्रांतिज्योती विद्यालय’, ‘रणपती शिवराय-स्वारी आगरा’ असे काही मराठी चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाले आहेत. तर, ‘पुन्हा साडे माडे तीन’, ‘लग्नाचा शॉट’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशातच आता अजून एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे. पहिल्यांदाच यामधून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासह चित्रपटात इतरही काही ज्येष्ठ आणि आघाडीचे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

नुकतीच ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ‘आरपार’, ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर ललित प्रभाकर आता नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्याने नुकताच या चित्रपटाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करीत याला ‘आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबासाठी सुपर डुपर भेट’ अशी कॅप्शन दिली आहे. समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर समोर आलेल्या व्हिडीओमधून हा एक कौटुंबfक चित्रपट असून, यामध्ये लगीनघाई पाहायला मिळणार असल्याचं दिसतं. अद्याप या चित्रपटाची कथा काय आहे याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

चित्रपटाची कास्ट

‘सुपर डुपर’ चित्रपटात ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्याच्याबरोबर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री विदुला चौघुले मुख्य नायिकेच्या भूमिकेतून झळकणार असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळतं. बऱ्याच दिवसांनंतर विदुला नवीन कलाकृतीतून तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटातून पहिल्यांदाच ललित व विदुला एकत्र काम करत असल्याने या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल. या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, कुशल बद्रिके, हृषिकेश जोशी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत.

ललित-विदुलाचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाची निर्मिती विजय शिंद, नरेश बोर्डे यांनी केली असून, ‘झी स्टुडिओ’च्या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.