Lalit Prabhakar painted his room with black paint : ललित प्रभाकर मराठी सिनेसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. ललित कायमच त्याच्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. अभिनेता नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. ललित कायम मोकळेपणाने त्याची मतं, प्रतिक्रिया आणि विचार व्यक्त करत असतो. अशातच आता त्याने त्याच्या घरातील खोलीला काळा रंग लावला असल्याचं म्हटलं आहे.
ललितचा ‘सुपर डुपर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्याबरोबर निर्मिती सावंत, विदुला चौगुले, शशांक शेंडे, नम्रता संभेराव यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ललितने ‘मित्र म्हणे’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याला त्याने संपूर्ण घराला काळा रंग केला आहे ते खरं आहे का असं विचारल्यानंतर त्याने हो म्हणत यामागचं कारण सांगितलं आहे. ललित याबद्दल नेमकं काय म्हणाला आणि काळा रंग लावण्यामागे काय कारण आहे याबद्दल जाणून घेऊयात…
ललित मुलाखतीत म्हणाला, “हो पण, संपूर्ण घराला नाही. एक खोली आहे जी पूर्ण काळी आहे. मी जेव्हा रंगकाम करणाऱ्या माणसांना काळा रंग लावायला सांगितला तेव्हा ती माणसं आधी हसली. त्यांना हा विनोद वाटला. मी त्यांना जेव्हा रंग निवडून दिला आणि म्हटलं की हा रंग द्यायचा आहे तेव्हा त्यांनी पुन्हा विचारलं की सांगा कोणता रंग द्यायचा आहे. मी त्यांना म्हटलं की हाच रंग द्यायचा आहे. खोलीत सगळीकडे हाच रंग हवाय.”
ललितने सांगितलं काळा रंग लावण्यामागचं कारण
त्यावेळी ललितबरोबर ‘सुपर डुपर’मधील कलाकारसुद्धा उपस्थित होते आणि त्याचवेळी तिथे असलेल्या निर्मिती सावंत यांनी ललितला यामागचं कारण विचारल्यानंतर अभिनेता गमतीत म्हणाला, “नजर लागू नये म्हणून…” यावेळी निर्मिती यांनी त्याला “तुला नजर लागू नये म्हणून तू काळ्या रंगाच्या घरात राहतोस?” असं विचारलं त्यावर ललित खरं कारण सांगत म्हणाला, “बरीच कारणं आहेत. असं कुठलं एकच कारण नाहीये. मला तिथे खूप एकटं वाटतं, मला तिथे छान वाटतं. मला असं वाटतं की भिंतींमध्ये किंवा वेगळ्या रंगांमध्ये आपली नजर मरते. काळ्या रंगात आपली नजर मरत नाही. आपण गावी गेल्यानंतर जेव्हा बाहेर झोपतो आणि वर बघतो तेव्हा आपली नजर जशी अनंतापर्यंत जाऊ शकते. काळ्या रंगात ती मरत नाही. असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला खोली छोटी वाटत नाही. काळ्याला काही अंत नसतो. असंही एक कारण आहे.”
