Lalit Prabhakar Shares His Struggle With Illness : ललित प्रभाकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो त्याच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ३ एप्रिल रोजी चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

ललित प्रभाकर यामध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत असून त्याच्याबरोबर या चित्रपटात विदुला चौगुले, निर्मिती सावंत, शशांक शेंडे, कुशल बद्रिके यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. त्यामुळे सध्या ललित चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या फिटनेसबद्दल बोलताना आजारपणाबद्दल सांगितलं आहे.

महिनाभर आजारी होता ललित

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ललितला चित्रपटात तुझा शर्टलेस सीन आहे. त्यातून तुझा फिटनेस दिसतो. तू डाएट फॉलो करतोस, व्यायाम करतो पण या सीनसाठी आपल्या ठरावीक शेपमध्ये दिसायचं आहे असा काही विचार केला होता का आणि यासाठी काही विशिष्ट तयारी करावी लागली का असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला मेहनत करावी लागली कारण त्याच्याआधी मी आजारी होतो. मी महिनाभर अंथरुणाला खिळलेलो. त्यामुळे शूटिंगसाठी कमी वेळ होता. त्यामुळे फार कमी काळात मला रिकव्हर व्हावं लागलं आणि ते झालं. पण, तो सीन करताना मजा आली.”

Award Banner

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी पुढे ललित प्रभाकरचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “ललित जे बोलला की तो आजारी होता. मला त्याचं वाईट वाटतं होतं. पण, त्याचं कौतुकही करावंसं वाटतं. त्याला जो त्रास होत होता त्यात काम करणं अवघड आहे. त्यात त्याला डान्सही करायचा होता. मला त्यासाठी फक्त त्याला सॉरी म्हणायचं आहे. पण, यामधून हेच कळतं की तो कामाच्या बाबतीत किती शिस्तप्रिय आहे.”

ललित प्रभाकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अभिनेता फिटनेस फ्रीक असून स्क्रीनवर छान दिसण्यासाठी विशेष काळजीसुद्धा घेतो. ‘सुपर डुपर’ या चित्रपटातील शर्टलेस सीनमुळे त्याच्या फिटनेसबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, ललितच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तर अलीकडेच तो ‘आरपार’ आणि ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटांतून झळकलेला. ‘आरपार’ या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. यामधून हृता दुर्गुळे व त्यानं पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. त्यामुळे त्यांची फ्रेश ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनेकांना आवडली. आता ‘सुपर डुपर’मधूनही तो व विदुला पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहणंसुद्धा रंजक ठरेल.