Laxmikant Berde First Wife : “काम हीच एनर्जी” असं म्हणत मराठी सिनेसृष्टीवर दोन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांची लोकप्रियता तुफान होती. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डेंचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी प्रिया बर्डे, त्यांचा मुलगा अभिनय अन् मुलगी स्वानंदी असा परिवार आहे. पण, त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रूही बेर्डे. त्या देखील उत्तम अभिनेत्री होत्या. लक्ष्मीकांत अन् रूही यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.

रूही यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘आ गले लग जा’ या हिंदी चित्रपटाद्वारे केली होती. पुढे ‘जावई विकत घेणे आहे’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. १९८३ मध्ये रूही अन् लक्ष्मीकांत यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर रूही यांनी काही काळ सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांनी रूही बेर्डेंची आठवण सांगितली आहे.

चेतन दळवी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “पूर्वी सेटवर लक्ष्मीकांतच्या घरून जेवण यायचं. लक्ष्मीकांतची बायको ( पहिली पत्नी रूही बेर्डे ) फिश वगैरे करून आणायची. संपूर्ण डबा भरून ती सर्वांसाठी सेटवर जेवण पाठवून द्यायची. हळुहळू सर्वांना समजलं की, लक्ष्मीकांतच्या घरून डबा येतो आणि आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो. सगळे सेटवर येऊन त्यांना विचारायचे…आज जेवायला काय आहे, घरी जाताना पुन्हा विचारायचे, मग उद्या काय असणार? अनेकदा लक्ष्मीकांत घरी जाऊन सांगायचा की, उद्या हे-हे बनवून पाठव. तिचं पण शूटिंग असायचं…तरी सकाळी उठून ती सगळं बनवायची.”

“ती शूटिंगला दुपारी यायची…कारण, मग सकाळी तिला हे सर्व जेवण करायला मिळायचं. मग हे जेवण घेऊन ती दुपारपर्यंत सेटवर यायची.” असं चेतन दळवींनी सांगितलं.

चेतन दळवी आणि लक्ष्मीकांत बेर्डें यांच्यात खूप छान मैत्री होती. या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये आणि नाटकात एकत्र काम केलं आहे. तर, रूही बेर्डेंबद्दल सांगायचं झालं तर, लक्ष्मीकांत यांच्याबरोबर त्यांनी जवळपास १५ वर्षे संसार केला. एक दिवस त्यांना प्रवासादरम्यान ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला. त्यावेळी त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, काही दिवस उपचार घेतल्यावर ५ एप्रिल १९९८ रोजी रुही यांचं निधन झालं.