Leena Bhagwat Health Update : मराठी मालिका, चित्रपट आणि विशेषत: रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच लीना भागवत. गेल्या काही दिवसांपासून त्या ‘आमने सामने’ नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र होत्या. हे नाटक थिएटरमध्ये सध्या हाऊसफुल सुरू आहे. या नाटकात लीना भागवत यांच्यासह मंगेश कदम, रोहन गुजर, केतकी विलास या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण, आता या लोकप्रिय नाटकातून पुढचे काही दिवस अभिनेत्री लीना भागवत ब्रेक घेणार आहेत. याबाबत त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

लीना भागवत यांच्या आवाजावर गेल्या काही दिवसांपासून ताण येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रुग्णालयात त्या उपचार घेत होत्या. पण, शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवाजासाठी त्यांनी एक छोटी Procedure केली. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना आता विश्रांती घ्यावी लागणार आहे. अभिनेत्रीने रुग्णालयातून फोटो शेअर करत एक सविस्तर पोस्ट लिहित आपली हेल्थ अपडेट चाहत्यांना सांगितली आहे.

लीना भागवत लिहितात, “मेरी आवाज ही पेहचान है…. आता पुढचे काही दिवस “कसं वाटलं नाटक?” असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय ‘मेरी आवाज ही पेहचान है…’ एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून ‘आमने सामने’चे प्रयोग लागोपाठ Housefull होत आहेत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते तेवढीच आम्ही कलाकार सुद्धा करतो. ‘आमने सामने’ मधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करू लागले पण, शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली… ‘पेहचान’ टिकवायची असेल तर एक छोटी Procedure करावीच लागेल. आणि अखेर काल ती Procedure पार पडली. डॉक्टर त्यांची संपूर्ण टीम, मंगेश, नाटकाची टीम पूर्ण वेळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीने उभी राहीन आणि पुन्हा म्हणेन “कसं वाटलं नाटक?”… तोपर्यंत एक छोटासा मध्यांतर… लवकरच भेटू ‘आमने सामने’!”

दरम्यान, लीना भागवत यांच्या पोस्टवर सीमा घोगळे, अनुष्का सरकटे, आरती सोलंकी, सुयश टिळक, सुरभी भावे, छाया कदम, सारिका नवाथे, क्षमा देशपांडे अशा असंख्य कलाकारांनी कमेंट्स करत त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय चाहते आता लीना भागवत यांच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहणार आहेत.