Loksatta Digital Adda Interview With Bhootam Bhayyam Team : भय आणि हास्याचं जबरदस्त मिश्रण असलेल्या ‘भूतम भयम्’ चित्रपटात सोशल मीडियावरचे स्टार क्रिएटर्स एकत्र झळकणार आहेत. ‘भूतम भयम्’ या चित्रपटातून करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे, शुभम जाधव, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम एका हटके आणि धम्माल अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, छाया कदम या सिनेमात हॉरर लूकमध्ये जठाईची भूमिका साकारणार आहेत. यानिमित्ताने या कलाकारांनी लोकसत्ता डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास संवाद साधला. या सिनेमाचं दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केलं आहे.

छाया कदम आपल्या भूमिकेबद्दल म्हणाल्या, “कलाकार म्हणून कायमच मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. अशी वेगळी आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा आपल्या वाट्याला यावी, अशी माझी नेहमीच अपेक्षा असते. ‘भूतम भयम’मधील ‘जठाई’ ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. तिचं दिसणं, बोलणं, हसणं, चालणं या प्रत्येक गोष्टीवर मला विशेष मेहनत घ्यावी लागली. विशेष म्हणजे ती गिब्रिश भाषेत बोलते आणि ती भाषा आत्मसात करणं माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. मात्र यासाठी संपूर्ण टीमने मला खूप साथ दिली.”

दिग्दर्शक म्हणाले, “छाया कदम यांच्याबरोबर काम करणं हे माझं स्वप्न होतं. ताईबरोबर काम करताना मला अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांनी प्रचंड डेडिकेशनने काम केलंय. कारण, ताई प्रोस्थेटिक मेकअपसाठी रोज आठ तास बसायची. बरं तो प्रोस्थेटिक काढतानाचा स्ट्रगलही वेगळा असतो. छाया ताईला ज्या जठा लावल्या होत्या…त्याचं वजन २० किलो होतं. एवढं सगळं ती कॅरी करून १२-१३ तास बसायची. तिला धड खाताही येत नव्हतं…त्यात सेटवर सगळीकडे उष्ण वातावरण असायचं. कारण, फायरचा सेटअप होता…हिट खूप होती. छाया ताईने खरंच या भूमिकेसाठी सर्वकाही केलं. तिची मेहनत पाहून मीच इमोशनल झालो आहे.”

दरम्यान, ‘भूतम भयम्’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.