Madhu Kambikar Passes Away ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. दीर्घकाळ आजारपणाशी झुंज दिल्यानंतर पुण्यात त्यांची प्राणज्योत मालवली. लावणी, सिनेमा आणि जाहिरात अशा सर्व माध्यमांतून मधु यांनी कला सादर केली होती. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मधु यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
महेश टिळेकर यांनी मधु कांबीकर यांच्याबरोबर काम केल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, विजय चव्हाण, कुलदीप पवार यांच्याबरोबर मधु कांबीकर यांचा फोटो शेअर केला आहे. यासह महेश टिळेकर यांनी आठवणींना उजाळा देत भावूक पोस्ट लिहिली. महेश टिळेकर यांनी लिहिले, “मधु कांबीकर…कुशल नृत्यांगना, कसदार अभिनेत्री मधु कांबीकर यांच्याबरोबर अनेक शो, मालिका, टीव्ही ॲड केल्या. अनेकदा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.”
लावणी नृत्य कोळून प्यायलेली ही अद्भुत नृत्यांगना – महेश टिळेकर
पुढे त्यांनी लिहिले, “लावणी नृत्य कोळून प्यायलेली ही अद्भुत नृत्यांगना. लावणीचा घरंदाजपणा जपण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी तयार केलेल्या ‘ ‘सखी माझी लावणी’ ह्या कार्यक्रमातून पारंपरिक लावण्यांवर नृत्य करताना त्यांना पाहून थक्क व्हायला व्हायचं. ‘मराठी तारका’ या माझ्या कार्यक्रमात पहिल्या शोपासून त्यांचा सहभाग होता. माझ्या टीव्ही मालिकांमध्ये पण त्यांनी अभिनय केला.”
महेश टिळेकर यांनी पुढे लिहिले, मी केलेल्या एका सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यात आणि गणपतीच्या आरतीमध्ये त्यावेळच्या त्यांच्या समकालीन आणि काही सिनियर अभिनेत्रींना मी एकत्र आणलं होतं. शूटिंगच्या दिवशी त्यांच्या समकालीन असलेल्या एका दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर त्यांचं कधी पटलं नव्हतं, दोघींमध्ये खूप शीतयुद्ध होतं..तिला पाहताच, तिच्याबरोबर काम करायचं म्हटल्यावर सुरुवातीला त्या नाराज झाल्या, पण मी हक्काने त्यांना “मधु ताई, जाऊ दे ना जुनं सगळं, माझ्यासाठी तुम्ही काम करायचं” असा आग्रह केल्यावर गालातल्या गालात हसत त्या “महेश तू ना फार जिद्दी आहे” असं म्हणाल्या.

पुढे त्यांनी लिहिले, “क्षणाचाही विलंब न लावता, जिच्याशी त्यांचं पटायचं नाही त्या अभिनेत्रीला मी हाताला धरून त्यांच्या समोर घेऊन आल्यावर, ‘बघितलं कसा आहे महेश, तुला मस्त कलरची साडी दिली आणि मला बघ हा कलर…’ अशी प्रेमळ तक्रार मधुताई त्या अभिनेत्री पुढे करू लागल्या “मधुताई तुम्ही इतक्या सुंदर आहात की तुम्हाला कुठलाही कलर शोभून दिसतो” असं मी बोलल्यावर पुन्हा एखाद्या तरुणीसारख्या त्या लाजल्या.”

टिळेकर यांनी लिहिले, “निळू भाऊ, कुलदीप पवार, आशा काळे, विजय चव्हाण यांना घेऊन मी एक टीव्ही ॲड केली होती. तेव्हा तर हे सगळे दिग्गज कलाकार एकत्र असताना ज्या गप्पा, मस्ती आम्ही केली ते विसरता येणारं नाही.. अविस्मरणीय अशा त्या आठवणी आहेत. त्या अंथरुणाला खिळून असताना दोनदा त्यांना भेटायला घरी गेलो होतो. देखणं रूप असलेली सदाबहार अभिनेत्री एकदम शांत, ओळख विसरलेली, कोण आलं गेलं काहीच त्यांना कळत नव्हतं…”
