Megha Ghadge emotional post for Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे पुण्यात निधन झाले आहे. दीर्घकाळ आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी कलाविश्वामध्ये लावणी व प्रभावी अभिनद्वारे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. मधू कांबीकर यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लावणी कलावंत व अभिनेत्री मेघा घाडगेने मधू कांबीकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, भावनिक आठवणींना उजाळा दिला आहे.

मधू कांबीकर यांच्या निधनानंतर मेघा घाडगेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मेघाने लिहिले, मधूताई… ‘सखी माझी लावणी’ हरपली..!! लावणीचा ठसका, घुंगरांचा नाद आणि पडद्यावरचा जिवंत अभिनय यांनी मधूताईंनी रसिकांच्या मनावर अनेक वर्षे राज्य केले. ‘एक होता विदूषक’मधील त्यांची भूमिका आणि त्यांनी सादर केलेली लावणी आम्ही कधीही विसरू शकणार नाही.”

त्यांच्याबरोबर काम करता आलं हे माझं भाग्य – मेघा घाडगे

पुढे तिने लिहिले, “अनेक वर्षे आजाराशी झुंज देऊनही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्याबरोबर ‘डोंबारी’मध्ये काम करता आले आणि त्यांची भेट घेता आली, हे माझे भाग्य. मधूताई आपल्यात नसल्या तरी त्यांची कला कायम आपल्याबरोबर राहील.”

madhu-kambikar-passes-away-megha-ghadge-tribute.jpg
ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन

पुढे मेघा घाडगने मधू कांबीकर यांना मिळालेल्या पुरस्कारांचा उल्लेख केला आहे. तिने लिहिले, “अभिनयातील योगदानासाठी मधू कांबीकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘शापित’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मराठी) पुरस्कार, तसेच ‘शापित’ आणि ‘हेच माझे माहेर’ या चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. ‘रावसाहेब’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना हंसा वाडकर विशेष पुरस्कार आणि २००७ मध्ये लावणी कलावंत पुरस्कारही मिळाला आहे.”

madhu-kambikar-passes-away-megha-ghadge-tribute.jpg
ज्येष्ठ अभिनेत्री व लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला होता. तमाशाच्या फडातून मधुूकांबीकर यांनी कला सादर करण्यास सुरुवात केली होती. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ व ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.