Madhurani Prabhulkar presented poem written by Nana Patekar: लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर अनेकदा कविता सादर करते. तिच्या कवितांना उत्तम प्रतिसादही मिळतो. आता नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नाना पाटेकरांनी लिहिलेली कविता सादर केली आहे.

“लहानपणी आई जखमेवर हळद लावत असताना…”

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत मधुराणी प्रभुलकर म्हणाली, “नाना सर स्वत: कविता करायचे, हे फार कमी जणांना माहीत आहे. त्यांनी आईवर लिहिलेली एक हृदयस्पर्शी कविता ऐकवते.”

तिने पुढे नाना पाटेकरांनी लिहिलेली कविता वाचली. ती अशी,
“लहानपणी आई जखमेवर हळद लावत असताना झोंबणार हे गृहीत धरून मी आधीच ओरडून रडायचो,
हळद लावून झाल्यानंतर आई विचारायची, झोंबलं का?
माझं रडणं वाया गेलेलं असायचं…
तेव्हा मी झोंबणं शोधायचो, आता आईचे हात शोधतो. “

व्हिडीओमध्ये पुढे मधुराणी म्हणाली, “नाना सर, असेच आम्हीही तुम्हाला शोधत राहणार. आम्हाला कायम तुमची आठवण येत राहणार.” हा व्हिडीओ शेअर करीत तिने लिहिले, “नाना पाटेकरसरांनी लिहिलेली एक हृदयस्पर्शी कविता. भावपूर्ण श्रद्धांजली.”

मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “खूप सुंदर. खऱ्या भावना अशाच असतात. म्हणून ही कविता फार सुंदर आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “मनस्वी माणूस आणि उत्तम कलाकार”, एकाने लिहिले, “फारच हळवे शब्द. नानांसारखा पहाडी माणूस जेव्हा असा हळवा होतो, तेव्हाच माणसातलं माणूसपण जाणवतं.” आणखी एकाने लिहिले, “खूप सुंदर”, अशा अनेक कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी नाना पाटेकरांचे कौतुक केले आहे.

दरम्यान, नाना पाटेकरांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले.