नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने अंधश्रद्धेच्या आधारे अनेक महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक केली. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचे भासवून, अंधश्रद्धा पसरवून आणि कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अशोक खरातला भेटायला अनेक राजकीय नेतेही गेल्याचे फोटो समोर आले होते. रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ, ज्यात त्या खरातचे पाद्यपूजन करत आहेत आणि डोक्यावर छत्री धरत आहेत, सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी अशोक खरातला अटक झाली व सध्या तो तुरुंगात आहे. या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या प्रकरणावर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ नावाचा चित्रपट येतोय.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री दिपाली सय्यद साकारणार आहे. पण अशोक खरातच्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल, ते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
टीझरमध्ये एका भव्य महालासारख्या वास्तूसमोर लोक उभे दिसतात. तिथे एक कार येते, त्यातून अशोक खरात उतरतो आणि रुपाली चाकणकर त्याच्यासाठी छत्री धरतात असं पाहायला मिळतं. नंतर अशोक खरात पुढे चालत जातो आणि तिथे असलेले लोक त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात, असंही टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. शेवटी अभिनेते उदय टिकेकर यांची झलक यात पाहायला मिळते.
पाहा टीझर
‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरुप सावंत यांनी केलं आहे. तर देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे व प्रशांत कदमपुरे यांनी निर्मिती केली आहे. सध्या चित्रपटातील फक्त दोनच कलाकारांची नावं समोर आली आहेत, ती म्हणजे दिपाली सय्यद व उदय टिकेकर. टीझर पाहिल्यानंतर अशोक खराच्या भूमिकेत कोणता अभिनेता असेल, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
दरम्यान, अशोक खरात महिलांचे शोषण करतानाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्याबरोबरच त्याने आर्थिक घोटाळाही केला. भोंदूगिरी, बनावट खडे व रुद्राक्ष विकून तसेच निनावी बँक खात्यांचा वापर करून त्याने तब्बल ४७ कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे ईडी तपासात उघड झाले आहे。
