‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या अभिनेता त्याच्या ‘अल्याड पल्याड’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मराठी कलाविश्वात अल्पावधीतच त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर केलेल्या मेहनतीच्या जोरावर गौरवने यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. अशातच अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास घटना घडली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात गौरव अन् ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची भेट झाली.

आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांना ओळखलं जातं. आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटावं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. आज गौरव मोरेची ही इच्छा पूर्ण झाली आहे. नाना पाटेकरांना भेटल्यावर गौरव भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. त्याने त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे. गौरवने नाना पाटेकरांबद्दल नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss OTT 3 : भव्य आरसा, प्रशस्त स्वयंपाकघर, बेडरूम अन्…; ‘बिग बॉस’च्या घराचे Inside फोटो आले समोर

गौरव मोरे लिहितो, “काय बोलू सुचत नाहीये. पाठीवरुन हात फिरवला… आशीर्वाद दिला आणि खूप कौतुक केलं. ज्यांना बघून आपण काम करतोय… ज्यांच्याकडून आपण कायम शिकत राहु असे आपले लाडके नाना पाटेकरसाहेब यांची एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेट झाली.”

गौरवच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “गौरव असाच साधा माणूस म्हणून जग… यश डोक्यात जाऊ देऊ नकोस तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा”, “गौरव दादा असाच पुढे जा”, “नशीबवान गौरव मोरे सर”, “तू खूप ग्रेट आहेस” अशा प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : Video: “कोण म्हणेल का मराठी गायक आहे म्हणून”, रोहित राऊतने पहिल्यांदाच गायलेलं तमिळ गाणं ऐकून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या गौरव हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेला ‘अल्याड पल्याड’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये गौरवसह मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.