Mahesh Manjrekar Birthday Siddharth Jadhav Post: सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आज (१६ ऑगस्ट) त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. समाजातील वास्तव आणि आशयघन विषय पडद्यावर प्रभावीपणे मांडणाऱ्या मांजरेकर यांच्या चित्रपटांनी नेहमीच वेगळी ओळख जपली आहे. त्यांच्या सिनेमांनी कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलंय, तर कधी त्यांना खळखळून हसवलं आहे. महेश मांजरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिनेता सिद्धार्थ जाधवनं पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत.

अनेक वर्षांपासून सिद्धार्थ जाधव हा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतो आहे. नाट्यभूमी, मराठी चित्रपटांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता बॉलीवूडपर्यंत पोहोचला आहे. यशस्वी अभिनेता म्हणून सिद्धार्थने ओळख निर्माण केली असून, त्याच्या या प्रवासामध्ये महेश मांजरेकर यांच्या सिनेमांचा मोठा वाटा आहे. ‘दे धक्का’ आणि ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमांतील सिद्धार्थच्या अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. आता महेश मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत सिद्धार्थ जाधवनं त्यांना ‘बापमाणूस’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे सिद्धार्थ जाधवची पोस्ट?

सिद्धार्थ जाधवनं इन्स्टाग्रामवर महेश मांजरेकर यांच्याबरोबर कारमधील फोटो शेअर केला आहे. याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांचा बापमाणूस म्हणून उल्लेख केला आहे. सिद्धार्थनं लिहिलं, “माझ्या आयुष्यातला बापमाणूस… महेश मांजरेकरसर तुम्हाला, वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सर, तुमच्याबद्दल मनामध्ये प्रेम आणि सन्मान असून, तो कायम राहणार आहे,” अशा आशयाची पोस्ट त्यानं केली.

महेश मांजरेकर यांच्या अनेक चित्रपटांमधील सिद्धार्थ जाधवनं साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. सिद्धार्थच्या सिनेविश्वातील प्रवासामध्ये दे धक्का या चित्रपटानं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. त्यानंतर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘कुटुंब’, ‘लालबाग परळ’, ‘फक्त लढ म्हणा’ व ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ अशा अनेक सिनेमांमध्ये सिद्धार्थनं त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे.

यापूर्वी सिद्धार्थ जाधवनं महेश मांजरेकर यांच्याबरोबरच्या बॉण्डिंगबाबत सांगितलं होतं. तो म्हणालेला, “ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही. मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. मला बरं वाटतं की, फिल्ममेकिंग किंवा या क्षेत्रातील काही शिक्षण घेतलं नाही. आपण काम करीत करीत शिकत आलो आहे. प्रत्येक चित्रपटाच्या वेळी ते मला मार्गदर्शन करीत असतात. त्यातूनच मी शिकत असतो. विनोदाच्या पलीकडे जाऊन तू काम करू शकतोस, तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे. तू ते करू शकतोस, हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला.”