Mahesh Manjrekar on audition: महेश मांजरेकर हे त्यांच्या दिग्दर्शनासाठी जितके ओळखले जातात, तितकेच ते त्यांच्या अभिनयासाठीदेखील ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. आता महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

महेश मांजरेकर यांनी नुकतीच ‘लेट्सअप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मी ऑडिशन घेत नाही, असे वक्तव्य केले. सिद्धार्थ बोडकेची पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात कशी निवड केली, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी सिद्धार्थ बोडकेचं तसं काही काम पाहिलं नव्हतं. तो नाटकात काम करतो. मी त्याचं खूप कौतुक ऐकलं होतं. तो ‘अरण्य’मध्ये काम करायचा. त्याची छोटी भूमिका होती; पण त्याचा खूप प्रभाव पडायचा.”

“प्रत्येक माणूस जेव्हा…”

“‘दृश्यम’मधील त्याचं काम पाहिलं होतं. तोपर्यंत सिद्धार्थचं ‘देवमाणूस’मध्ये कास्टिंग झालं नव्हतं. माझं झालं होतं; पण त्याचं अजून झालं नव्हतं. त्याला बघितल्यानंतर वाटलं होतं. माणसाची एक पॉवर असते. प्रत्येक माणूस जेव्हा तो भेटायला येतो, तेव्हा त्याची एक पॉवर असते. मला त्याला भेटल्यावर वाटलं होतं की, हा शिवाजी महाराजांची भूमिका उत्तमरीत्या साकारेल.”

“त्याच्यात आत्मविश्वास…”

पुढे ते म्हणाले, “मी ऑडिशन घेत नाही. मला ऑडिशन घ्यायला आवडत नाही. कारण- ते घोडेबाजारात जाऊन घोडे घेतल्यासारखं असतं. कलाकाराशी बोलून कळतं की, तो बरा कलाकार आहे. तो ऑडिशन चांगली देईल; पण तो भूमिका चांगली साकारेल, याची गॅरंटी काय आहे? त्यामुळे मी माझ्या इंस्टिंक्टनुसार निर्णय घेतो. मला काय वाटतं, यानुसार निर्णय घेतो.”

महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “कलाकाराशी बोलल्यावर कळतं की, त्याच्यात आत्मविश्वास आहे की नाही? मला त्या कलाकारामध्ये आत्मविश्वास पाहिजे असतो. एखाद्या कलाकाराला मी भूमिकेची ऑफर दिली आणि त्यानं मला विचारलं की, तुम्हाला वाटतं का की, मी ही भूमिका करू शकेन. तर मी त्याला सांगतो की, तू घरी जा. मला वाटून काही उपयोग नाही. त्या कलाकाराला वाटलं पाहिजे की, तो ती भूमिका साकारू शकतो.”

सिद्धार्थला कास्ट केल्यानंतर अनेकांनी त्याला का कास्ट केलं, असाही प्रश्न लोकांनी विचारला होता. पण, मी त्यांना सांगितलं होतं की, हा मुलगा ही भूमिका उत्तम साकारेल.

दरम्यान, आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.