Mahesh Manjrekar Talks About Tighi Movie : ‘दशावतार’, ‘जारण’, ‘गोंधळ’, ‘आरपार’, ‘उत्तर’ असे वेगळ्या विषयांवर आधारित अनेक चित्रपट अलीकडे मराठीमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच अलीकडे ‘तिघी’ हा एक नवीन चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

दिग्दर्शिका जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ चित्रपट ६ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘तिघी’ या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकत आहेत. नेहा पेंडसेने या चित्रपटाची सहनिर्मितीसुद्धा केली आहे. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांकडून सिनेमाचं कौतुक होत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीसुद्धा या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

महेश मांजरेकर यांनी गेल्या आठवड्यातच ‘तिघी’ हा चित्रपट पाहिला असून आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली असून प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. महेश मांजरेकर सोनाली कुलकर्णी, भारती आचरेकर व नेहा पेंडसे यांच्या चित्रपटाबद्दल नेमकं काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Award Banner

महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले?

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत महेश मांजरेकर भारती आचरेकर यांच्या ‘तिघी’ सिनेमाबद्दल म्हणाले, “मी गेल्या आठवड्यात ‘तिघी’ नावाचा सिनेमा पाहिला. एका तरुण दिग्दर्शिकेने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फारच संवेदनशील सिनेमा बनवला आहे आणि कामं काय कमाल केली आहेत. भारती आचरेकर, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी या सर्वांनीच उत्तम काम केलं आहे. चित्रपटातील सर्वच लोकांनी लिखाण, छायाचित्र या सर्व गोष्टी उत्तमरीत्या हाताळल्या आहेत.”

‘तिघी’ चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “मला फक्त प्रेक्षकांना विनंती करायची आहे, सुंदर मराठी सिनेमा बनवलाय, थिएटरमध्ये अजून आहे तो, कृपया हातातली कामं बाजूला ठेवा आणि सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहा; एक खूप सुंदर संवेदनशील चित्रपट आहे.”

महेश मांजरेकर नेहमीच मराठी चित्रपट व नाटकांबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अलीकडेच त्यांचा ‘पुन्हा शिवाजी राजे’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला. सध्या रंगभूमीवर त्यांचं ‘फिल्टर कॉफी’ हे नाटकसुद्धा सुरू आहे. महेश मांजरेकर यांच्यासह अभिनेत्री तितीक्षा तावडेनेसुद्धा या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.