ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या मुलाने कलाविश्वापासून वेगळा मार्ग निवडत आपलं स्वत:चं हॉटेल सुरू केलं. सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात झळकणार होता. परंतु, सध्या महेश मांजरेकर यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिला आहे. सत्याचा स्वभाव आणि त्याच्या करिअरविषयी महेश मांजरेकरांनी नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
महेश मांजरेकर मुलाबद्दल म्हणाले, “सत्या माझा खूपच गूडबॉय आहे. आजकालच्या सोसायटीमध्ये तो खूप मिसफिट आहे. कारण, तो कधीच कुणाचाही वाईट विचार करत नाही. तो भयंकर इमोशनल होतो आणि सत्या खूप जास्त साधा आहे. शाळेत त्याला एडीएचडी आजार होता. त्यामुळे तेव्हा त्याला थोडा त्रास व्हायचा. पण, मी नक्की सांगतो तो कधीच कुणालाही हर्ट करणार नाही. चिडला की खूप चिडतो…पण, तो खूप भावनिक आहे. तो जसा आहे तसाच मला आवडतो.”
अभिनेते पुढे म्हणाले, “मी त्याच्याशी अगदी मित्रासारखा वागतो. त्याला अभिनय करायचा होता पण, मी त्याला म्हटलं नको. मी त्याची समजूत काढली आणि त्याला सांगितलं सध्या तू फक्त बिझनेस सांभाळ…त्यानेही माझं ऐकलं. रात्री-अपरात्री माझ्या कोणत्याही मुलाने मला एक हाक जरी मारली तरी मी सगळं काही सोडून सर्वात आधी तिथे जाईन. माझ्या मुलांच्या बाबतीत मी प्रचंड पझेसिव्ह आहे. त्यांना कोणी ट्रोल वगैरे केलं तर, मला भयंकर संताप येतो.”
“माझ्या चित्रपटाबद्दल बोला, काही आवडलं नाही नक्की सांगा पण, वैयक्तिक पातळीवर जर कोणी ट्रोल केलं तर मी समोरच्या व्यक्तीला शोधून काढेन. कारण, माझ्या मुलांचा या सगळ्याशी खरंच संबंध नाही. तुम्ही मला बोला पण, वैयक्तिक आयुष्यावर या ट्रोलर्सनी जायचं नाही.” असं स्पष्ट मत महेश मांजरेकरांनी मांडलं आहे.
काही दिवसांपूर्वी सत्या अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल म्हणाला होता, “मी अभिनय क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न केला पण, नंतर मी कंटाळलो. त्यात पप्पांचं पण स्वप्न होतं हॉटेल उघडायचं मग मी संपूर्णपणे यात लक्ष घातलं.”
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच त्यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी स्वत: या सिनेमाचं कथा लेखन केलं आहे, याशिवाय हा सिनेमा दिग्दर्शित सुद्धा तेच करणार आहेत. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. त्याच्यासह बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.