Mahesh Manjrekar talks about frist wife: प्रसिद्ध अभिनेते अन् दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘बंडखोर’ हा महिलांवर आधारित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातील सक्षम आणि खंबीर महिलांबद्दल भरभरून भाष्य केले आहे. बालपणीच्या आईच्या खंबीर साथीपासून ते इंडस्ट्रीत स्थापन होण्यामागे असणारा पहिली पत्नी आणि सासूचा पाठिंबा, तसेच मोठी मुलगी अश्वमीने दिलेले धडे, या सर्वांचा उल्लेख त्यांनी केला. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वच महिला अत्यंत खंबीर होत्या, असं मांजकरेकर म्हणाले.

आईचा उल्लेख करत महेश मांजरेकर म्हणाले, “मी लहानपणापासून माझ्या आईला पाहिलंय. मी तिचा खूप आदर करतो, कारण ती शिकलेली नव्हती. फार मोठ्या कुटुंबातून आली नव्हती; पण मी तिच्याइतकी खंबीर बाई माझ्या आयुष्यात आजपर्यंत पाहिलेली नाही. त्यामुळे माझ्यावर आईचा खूप प्रभाव आहे. मी अजूनही ती गेलीये हे स्वीकारलेलं नाही.”

महेश मांजरेकर पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाले?

महेश मांजरेकर यांनी पहिल्या पत्नीचा व तिच्या आईचाही उल्लेख केला. “माझी पहिली बायको व तिची आई यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज या इंडस्ट्रीत आहे. आता जो काही आहे, तो त्यांच्यामुळेच, कारण त्या कायम माझ्याबरोबर सावलीसारख्या होत्या. काहीही झालं तरी त्या माझ्याबरोबर होत्या,” असं महेश मांजरेकर झी न्यूजशी बोलताना म्हणाले.

मुलगी अश्वमीबद्दल महेश मांजरेकर म्हणाले…

महेश मांजरेकर यांनी त्यांची मोठी मुलगी अश्वमीबद्दलही सांगितलं. “माझी मोठी मुलगी, तिने मला आयुष्यात खूप काही शिकवलं. त्यातलं एक असं की ‘आम्हाला अक्कल आहे, आम्हाला शिकवायला जाऊ नका.’ मी तिच्याबरोबर सिनेमाबद्दल बोलतो आणि ती ज्या पद्धतीने सिनेमा बघते, ती खूप उत्तम दिग्दर्शिका होऊ शकते. मी तिला बोललो होतो की तुझ्यासाठी चित्रपट करतो. ती म्हणाली होती की ‘तू निर्माता असशील तर मी करणार नाही.’ माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्याच बायका खूप खंबीर आहेत, असं महेश मांजरेकर म्हणाले.

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी कोण होत्या?

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव दीपा मेहता होतं. त्यांचं लग्न १९८७ साली झालं होतं. त्यांना अश्वमी मांजरेकर व सत्या मांजरेकर ही दोन अपत्ये आहेत. १९९५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दीपा मेहता एक प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. त्यांचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ (Queen of Hearts by Deepa Mehta) हा साड्यांचा ब्रँड विशेष लोकप्रिय होता. २५ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी दीपा मेहता यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दुःखद घटनेची माहिती दिली होती.

महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मेधा मांजरेकर असून त्यांना सई मांजरेकर नावाची मुलगी आहे.