Medha Mahesh Manjrekar Cancer Battle: सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर या दोघांनी कॅन्सरसारख्या आजाराला झुंज दिली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहित मेधा यांनी कर्करोगावरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केल्याचे सांगितले होते. यानंतर संपूर्ण सिनेविश्वातून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या. आता महेश मांजरेकर यांनी मेधा या उपचाराच्या काळात कशा खंबीर राहिल्या हे सांगितले.
‘न्यूज १८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी ‘बंडखोर’ सिनेमामध्येही मेधा मांजरेकर भूमिका साकारणार होत्या, पण कर्करोगामुळे त्यांना काम करता न आल्याचे सांगितले. ते म्हणाले, “‘बंडखोर’मध्ये मेधा असणारच होती. ती यामध्ये प्रियदर्शिनी इंदलकरच्या आईची भूमिका करणार होती, पण त्यावेळीच कर्करोगाचे निदान झाले आणि तिचे केस गळू लागले, यामुळे तिला सिनेमातून बाहेर पडावे लागले.”
आम्ही कॅन्सरला घाबरत नाही – मांजरेकर
पुढे मांजरेकर म्हणाले, “केस गळाले असले तरी सिनेमामध्ये खोट्या केसांचा विग लावून काम करता आले असते, पण त्याकाळामध्ये ती शारीरिकदृष्ट्या कमजोर झाली होती. त्यावेळी तिचा केमो वगैरे सुरू झाला. आता तिची तब्येत पूर्ण बरी आहे. आम्ही कॅन्सरला घाबरत नाही, मी पण एक उदाहरण आहे. मी नेहमी असा विचार करतो की, १० वर्षांच्या मुलालासुद्धा कर्करोग झाला आहे, त्यामुळे मला वेगळे असे काहीही झालेले नाही आणि आता खूप औषधे आणि उपचार उपलब्ध आहेत.”

पुढे ते म्हणाले, “माणसांचे करोना व डेंग्यू यांसारख्या आजारातूनही निधन झाले आहे. हे आजार झाल्यावरही माणसाने घाबरले पाहिजे, कारण त्यानेसुद्धा मृत्यू होऊ शकतो किंवा माणूस जगूसु्द्धा शकतो. त्यामुळे मी मला जगू शकणाऱ्या व्यक्तीमध्ये बघत होतो. मेधाने माझ्यावेळी दोन वर्षे हे सर्व पाहिल्यामुळे तिचीसुद्धा तयारी झाली होती. आम्ही खूप निवांत आहोत, कोणत्याही बाबतीत इतरांनी आम्हाला येऊन आधार देऊ नये. माझ्यावेळेस तर मी कोणाला सांगितलं पण नव्हते.”


पुढच्या सिनेमामध्ये तिला घेणार – महेश मांजरेकर
पुढे मेधा यांच्या तब्येतीबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “आता ती पूर्णपणे बरी आहे. मी लवकरच तिला पुढच्या सिनेमामध्ये घेणार आहे. कारण- तिला बॉयकट खूप चांगला दिसतोय.”
