Mahesh Tilekar Share Sidharth Jadhav Video: महेश टिळेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माते आहेत. त्यांचा ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. महेश टिळेकर हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तपणेसाठी ओळखले जातात.

सिद्धार्थ जाधवचा व्हिडीओ शेअर करत महेश टिळेकर म्हणाले…

आता महेश टिळेकर यांनी शेअर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. ‘गाव तसं चांगलं’च्या शूटिंगदरम्यानचा सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले, “हा असाच आहे, अनेकांसाठी तो सिद्धू असला तरी इतकं चांगलं नाव असल्यामुळे सिद्धार्थ या पूर्ण नावानेच आत्तापर्यंत मी त्याचा उल्लेख करत आलो आहे. २००८ मध्ये सिद्धार्थने पहिल्यांदाच माझ्याबरोबर ‘गाव तसं चांगलं’ या सिनेमाच्या निमित्ताने काम केलं. सिनेमात दिग्गज कलाकार होते. मूळ स्क्रिप्टमध्ये निळूभाऊंबरोबर सिद्धार्थचा एकही सीन नव्हता, पण कुठेतरी त्यावेळी नवीन असलेल्या सिद्धार्थला निळूभाऊंबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून मी मुद्दामच सिद्धार्थ आणि निळूभाऊंचा सीन लिहिला.”

पुढे त्यांनी लिहिले, “शूटिंगच्या वेळी एरवी एका जागी कधीही शांत न बसणारा, वर्गात एखादा मस्तीखोर विद्यार्थी असतो अगदी तसाच हा सिद्धार्थ आहे. काम करताना धमाल करणारा, पण निळूभाऊ जेव्हा सेटवर असायचे तेव्हा वर्गात हेडमास्तर आल्यावर जशी मुलं शांत होतात अगदी तसाच गुणी बाळ असल्यासारखा सिद्धार्थ वावरायचा. हा गुणी कलाकार कसा सेटवर असायचा ते या पोस्टमधील व्हिडीओमधून कळेलच”, असे म्हणत महेश टिळेकर यांनी ‘गाव तसं चांगलं’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगितली.

महेश टिळेकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव म्हणतो, “आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. सकाळी आमच्या एका सीनचे शूटिंग करण्याचे राहिले होते. प्रकाश येत नाही म्हणून आम्ही थांबलो होतो. आम्हाला या सगळ्याची मजा येत आहे. देबू दादा, महेश टिळेकर हे परफेक्शनिस्ट आहेत. तो शॉट त्यांना त्याच लाईटमध्ये हवा आहे. सकाळी आम्ही दहा वाजता तो शॉट घेत होतो, त्यावेळी ढग होते. आता पाऊणे पाच वाजले आहेत, पण देबू दादा म्हणत आहेत की मला त्याच लाईटमध्ये शॉट हवा आहे. मोठ्या लोकांबरोबर काम करताना अशी चांगली गोष्ट शिकायला मिळते.”

सिद्धार्थच्या मागे इतर कलाकार बसलेले दिसत आहेत. तसेच आजूबाजूला हिरवागार परिसर पाहायला मिळत आहे. ‘गाव तसं चांगलं’ या सिनेमात अनेक लोकप्रिय कलाकार दिसले होते. सिद्धार्थ जाधवसह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, किशोरी आंबिये, क्रांती रेडकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.

दरम्यान, सिद्धार्थ जाधव हा आता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहे. त्याने काही हिंदी सिनेमांतही काम केले आहे.