मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक म्हणून महेश टिळेकर यांना ओळखलं जातं. त्यांच्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सामाजिक विषयांवर तसेच कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर महेश टिळेकर परखडपणे आपलं मत मांडत असतात.

मराठी कलाकारांना मुंबईत घरं मिळावीत यासाठी काही वर्षांपूर्वी महेश टिळेकर यांनी प्रयत्न केले होते. यानंतर काही कलाकारांना सरकारी कोट्यातून माफक किमतीत मुंबईतील उच्चभ्रू भागात घरं मिळाली होती. मात्र, यादरम्यान दिग्दर्शकांना काही कलाकारांचे वाईट अनुभव सुद्धा आले. याविषयी महेश टिळेकरांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

महेश टिळेकर म्हणाले, “यापैकी काही कलाकारांनी ओळख ठेवली…काहींनी ठेवली नाही. आता एक अभिनेत्री सरकारी अधिकाऱ्याची पत्नी आहे, तिला त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्याचा फ्लॅट मी मिळवून दिला होता. तिला तोच फ्लॅट हवा होता…कारण तो तिचा लकी नंबर आहे. खरंतर, तिने तो फ्लॅट पाच वर्षांत विकला…म्हणजे तिला या सगळ्याची खरी गरजच नव्हती. तिथे तिला भेटायला…तिचे वेगवेगळे मित्र यायचे. पाच वर्षांनी जेव्हा तिने तो फ्लॅट विकला तेव्हा…ज्या सहकाऱ्याचा फ्लॅट तिने बदलून घेतला होता, त्याला फोन करून तिने निदान कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे होती. मग माणूस चिडणार की नाही?”

ते पुढे म्हणाले, “त्या बॅकस्टेज आर्टिस्टने केवळ माझ्या सांगण्यावरून तिला तो फ्लॅट बदलून दिला होता. त्या फ्लॅटचा व्ह्यू खूप छान होता..हे तिला बरोबर माहिती होतं. पुढे, फ्लॅट विकल्यावर त्या अभिनेत्रीला व्ह्यूमुळे सुद्धा जास्त पैसे मिळाले होते. आता तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असता…आम्ही असं केलं वगैरे… कशाला हा खोटेपणा? मग मला म्हणाली, मी त्याला चांदीचं निरांजन देते…अरे काय चांदीचं निरांजन? तेव्हा ते फ्लॅट ५२ लाखांना मिळाले होते. विकताना त्या फ्लॅटची किंमत दीड कोटींच्या पुढे होती.”

“या सगळ्यामुळे जे खरंच गरजू कलाकार आहेत…ते मागे राहतात. मी असा विचार करतो, आपल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल तर करुयात.” असं मत महेश टिळेकरांनी व्यक्त केलं आहे.