Makrand Anaspure’s Wife Talks About Politics In Industry : मकरंद अनासपुरे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे यांनीदेखील अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, काही काळानंतर त्यांनी हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. अशातच आता त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
शिल्पा अनासपुरे व मकरंद अनासपुरे यांची पहिली भेटही नाटकाच्या दरम्यानच झालेली. या दोघांनी नुकतीच ‘दूरदर्शन सह्याद्री’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली. यासह मकरंद यांनी या क्षेत्रात काम करत असताना खासगी आयुष्यात त्यांना किती संघर्ष करावा लागला याबद्दल सांगितलं. तर शिल्पा यांनीही त्यांनी अभिनय क्षेत्र सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
शिल्पा अनासपुरे यांनी सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्यामागचं कारण
शिल्पा अनासपुरे यांना मुलाखतीत “तू चांगल्या घरातून आलेली होतीस, पण अभिनेत्री व्हायचं तुझंही स्वप्न होतं का? तू जाऊबाई जोरातचे काही प्रयोग केले, मालिकांमध्ये काम केलं आणि नंतर काम करणं बंद केलं”; असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “हो मला अभिनेत्री व्हायचं होतं. पण, जेव्हा मी जाऊबाई जोरातचे प्रयोग केले आणि नंतर मालिकांमध्येही काम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण अभिनय जर चांगला करत नसू तर एकवेळ तो आपण स्वत:वर काम करून शिकू शकतो, पण त्याच्या व्यतिरिक्त मला इथे जाणवलं की इथे फार अपमानास्पद वागणूक दिली जाते.”
शिल्पा पुढे म्हणाल्या, “अपमानास्पद वागणूक देणं, राजकारण करणं, ग्रुपिजम करणं हे सगळं व्हायचं आणि ते मला कधीच जमणार नव्हतं. माझा स्वभावही तसा नाही. मी आधी कधीच असं पाहिलं नव्हतं. आमच्या घरी कोकणातसुद्धा मोठं कुटुंब आहे, आम्ही ज्या सोसायटीत राहायचो तिथे मी हेच पाहिलंय की बायका, पुरुष, मुलं सगळे गुण्या गोविंदाने राहतात; त्यामुळे एखाद्याला तोंडावर पाडणं, अपमानास्पद बोलणं, त्याला वाईट वाटेल अशी वागणूक देणं हे मला अजिबात माहीत नव्हतं.”
शिल्पा यांनी पुढे याबद्दल सांगितलं की, “यामुळे आपण हे शिकूयात आणि पुढे चांगली अभिनेत्री होऊयात असंही काही मत नव्हतं. त्याच्यामुळे मी अंदाज घेतला थोडा आणि मग वाटलं की नाही, हे नाही जमणार मला. बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी हळूहळू काढता पाय घेतला. त्यानंतर मकरंद त्याच्या कामात व्यग्र होऊ लागला; मग त्याला एका असिस्टंटची, मॅनेजरची गरज होती, मग ती जबाबदारी मी सांभाळली.”
