‘राजी शिवाजी’नंतर मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दमदार घोडदौड पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखच्या या चित्रपटाने विक्रमी कमाई करत मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान पटकावला. आता त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’नेही बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने दमदार कमाई करत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा बहुचर्चित मराठी विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि कुशल बद्रिके, संतोष जुवेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ३१ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिपभोवती फिरते. या प्रवासात घडणारे विनोदी प्रसंग, मैत्री आणि मनोरंजक घटनांमुळे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. फिल्मीविलाच्या अहवालानुसार, या चित्रपटाचं अंदाजित बजेट ७ कोटी रुपये असून बॉक्स ऑफिसवर तो सध्या अपेक्षित कमाई करत आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चं तिसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन दिवस पूर्ण झाले आहेत. कोइमोईच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ४१ लाख रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, शनिवारी चित्रपटाने २३ लाख रुपये, तर पहिल्या दिवशी ८ लाख रुपयांचा गल्ला जमवला होता.
यासह ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने ओपनिंग वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत ‘रणपति शिवराय – स्वारी आग्रा’च्या ६४ लाख रुपयांच्या कमाईचा विक्रम मागे टाकला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता मराठीतील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा पहिला क्रमांक असून, या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्ये तब्बल ३७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’च्या दमदार सुरुवातीमुळे आगामी दिवसांत त्याच्या कमाईकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यासह चित्रपटाचं तीन दिवसांचं एकूण नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ७२ लाख रुपये इतकं झालं आहे. तर ओपनिंग वीकेंडचं ग्रॉस कलेक्शन ८४ लाख रुपयांवर पोहोचलं आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२०२६मध्ये दमदार ओपनिंग करणारे टॉप १० मराठी चित्रपट
१. राजा शिवाजी- ३७ कोटी
२. देऊळ बंद २- १५.७५ कोटी
३. तुंबाडची मंजुला- ३.२५ कोटी
४. घबाडकुंड – २.४३ कोटी
५. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ – २.२ कोटी
६. ‘अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई’ – १.८ कोटी
७. भूतम् भयम् – १.४८ कोटी
८. सुपर डुपर- ८५ लाख
९. मामाच्य गोव्याला जाऊया- ७२ लाख
१०. रणपति शिवराय-स्वारी आगरा- ६४ लाख
