Mandar Shinde : केदार शिंदे हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचे भाऊ मंदार शिंदे सुद्धा काही वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत सक्रिय होते. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पण, मधल्या काही वर्षांत त्यांच्या कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार आले. त्यामुळेच एकेकाळी दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या मंदार शिंदेंना आज घर चालवण्यासाठी ड्रायव्हर म्हणून नोकरी करण्याची वेळ आली आहे. यासाठी त्यांनी इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीला देखील जबाबदार धरलं आहे.

मंदार शिंदे ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “इंडस्ट्रीत लोक फक्त तोंडावर गोड बोलतात. अरे वाह! तू एवढ्या मोठ्या माणसाचा नातू आहेस किंवा एवढ्या मोठ्या माणसाचा भाऊ आहेस…पण, मागून हेच लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात. तुम्ही कितीही चांगले असलात तरी, जोवर तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार नाही तोपर्यंत तुमच्याकडून काहीच होणार नाही. मी येत्या पिढीला एक गोष्ट आवर्जून सांगेन ती म्हणजे, जर तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीयेत आणि तरीही तुम्हाला या इंडस्ट्रीत यायचंय तर अवश्य या पण, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्याकडे बॅकिंग हवं. दुसरी कोणतीही कला तुम्हाला यायला हवी. ज्यामुळे तुमचं पोट भरू शकेल. जी कला सुदैवाने माझ्याकडे होती. आज मला कुठेच काम नाहीये…मला कुणी कामासाठी बोलवत नाहीये..त्यामुळे आज त्या दुसऱ्या कलेचा मला पुन्हा एकदा उपयोग होतोय. ती कला म्हणजे ड्रायव्हिंग.”

ते पुढे म्हणाले, “तेव्हा माझं घर मला चालवायचं होतं…त्यामुळे मला सगळं सोडून ड्रायव्हिंगचा मार्ग स्वीकारावा लागला. मी न लाजता सांगतो, मी एका व्यापाराकडे ड्रायव्हिंगची नोकरी करतो. सुदैवाने ते व्यापारी खूप चांगलेत. मला खूप मदत करतात आणि मी इमानदारीने ते काम करतोय.”

“मी अनेक मालिकांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. त्या मालिकांचे टीआरपी चांगले होते. पण, याचं क्रेडिट केवळ कलाकारांचं होतं का? माझं त्यात काहीच नव्हतं का? या सगळ्याचा राग नक्कीच येतो पण, सांगणार कुणाला? मी एक चांगला आणि इमानदार दिग्दर्शक आहे. आता हा व्हिडीओ पाहून मला पुन्हा कोणी काम दिलं तर मी नक्कीच करेन.” असं मंदार शिंदेंनी सांगितलं.

केदार शिंदेंबद्दल मंदार शिंदे काय म्हणाले?

“बालपणी आजोबांच्या ( शाहीर साबळे ) घरी माझं येणं-जाणं होतं. केदार दादा लहानपणापासून शाहीरांच्या घरीच राहायला होता. मी माझ्या आईच्या घरी काळाचौकीला वाढलो, तिथेच माझा जन्म झाला होता. आई दररोज मला परळ व्हिलेजमधील आजोबांच्या घरी घेऊन जायची, तिथे केदार दादा पण असायचा. आमच्या शाळा वेगवेगळ्या होत्या. आम्हाला ५-७ वर्ष माहीतच नव्हतं की आम्ही सख्खे भाऊ आहोत. कारण त्याचं सगळं वलय वेगळं होतं. मी वेगळीकडे राहायला होतो. साधारण ५-७ वर्षांनंतर केदार दादाला समजलं की माझी आई हीच त्याची सुद्धा आई आहे. मग, त्याला समजलं की मी त्याचा सख्खा भाऊ आहे. पण, त्यानंतरही आमच्यात कायम अंतर होतं.”