Mangesh Desai shares Video with Parents: आयुष्यात प्रत्येकाच्या भूमिकेत वेळेनुसार बदल होत असतो, त्यानुसार जबाबदाऱ्याही बदलतात. पालक व मुले यांच्या नात्यात असे अनेक क्षण पाहायला मिळतात. आता लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलदेखील दिसत आहेत. ते त्यांच्यासह मुंबईत फिरत आहेत. ते त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, मंगेश देसाई त्यांच्या आई-वडिलांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तितक्यात जवळच असलेले एक लहान बाळ मोठ्याने रडताना ऐकायला येते. त्यांचे आई-वडील त्या बाळाजवळ जातात, ते त्या बाळाशी बोलतात. त्यानंतर मंगेश देसाई दाखवत असलेले ठिकाण बघतात. नंतर ते पुढे चालू लागतात. व्हिडीओच्या शेवटी ते एकमेकांचा हात हातात घेऊन चालत असल्याचे दिसतात. व्हिडीओत समुद्रही पाहायला मिळत आहे.
मंगेश देसाईंनी आई-वडिलांना दाखविली मुंबई
हा व्हिडीओ शेअर करत मंगेश देसाई यांनी लिहिले, “लहानपणी दादा मला मुंबई दाखवायला घेऊन यायचे, या वेळी मी त्यांना बदललेली मुंबई दाखवायला घेऊन आलो. ते सुद्धा कौतुकाने पाहत होते. खरं तर या दोघांमुळेच मी त्यांना बदललेली ही मुंबई दाखवू शकलो.” शेवटी त्यांनी, “माझा उगाचच शहाणपणा”, असे लिहित हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच, गॉडमदर, गॉडफादर तसेच नरिमन पॉईंट असे हॅशटॅग दिले आहेत. म्हणजेच, मंगेश देसाई त्यांच्या आई-वडिलांसह नरिमन पॉईंट परिसरात फिरायला आले होते.
मंगेश देसाई यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “सर, तुम्ही तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण टिपत आहात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “आई-बाबांना सलाम, त्यांची पुण्याई”, आणखी एकाने लिहिले, “आपल्या ज्येष्ठांना अशा ठिकाणी पुन्हा एकदा आनंदाने भेट देताना पाहणं खरंच मनाला खूप समाधान देणारं आहे. अशा क्षणी वाटतं की हे सर्व बदल, सुधारणा आणि केलेले प्रयत्न सार्थकी लागले, माझा त्यांना सस्नेह नमस्कार आणि मनःपूर्वक शुभेच्छा नक्की कळवा”, एकाने लिहिले, “आज आपण जे आहोत ते आई-वडिलांच्या पुण्याईमुळे आहोत. आतापर्यंत ते आपली काळजी घेत होते, आता यापुढे आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे”, एकाने लिहिले, “मंगेश सर, तुमच्याबद्दल खूप आदर आहे.”





चाहत्यांबरोबर किशोरी अंबिये आणि संतोष जुवेकर यांनीही कमेंट्स केल्या आहेत. किशोरी अंबिये यांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे, तर संतोष जुवेकरने लिहिले, “तुझे आई बाबा आणि तू. तू त्यांना मुंबई दाखवतोयस आणि त्यांना ते लेकरू का रडतंय याची काळजी; याला म्हणतात काळजी आणि प्रेम.”


दरम्यान, मंगेश देसाई आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
