Manmohan Mahimkar : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार सध्या कामाच्या शोधात फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांकडे कामं नाहीत, यामुळे खर्चाला पैसे पुरत नाहीत. परिणामी, उतारवयात या कलावंताना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी काम मिळत नसल्याची तक्रार ‘बिग बॉस मराठी’ फेम प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे केली होती.

एवढंच नव्हे तर, काम मिळत नसल्याने इच्छामरण यावं अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर मनमोहन माहिमकर यांना अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर संकट ओढवलं असून, एका युट्यूब वाहिनीशी संवाद साधताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

मनमोहन माहिमकर म्हणतात, “मी अविवाहित ज्येष्ठ कलावंत आहे. मी आज जवळपास ३४ ते ३५ वर्षे मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतोय. ‘ही पोरगी कुणाची’ हा माझा पहिला चित्रपट होता. मी जवळपास २५-३० मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय काही हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. पण, आता परिस्थिती बदललीये. मला आता ३ ते ४ वर्षे कुठेही काम मिळत नाहीये, काही उत्पन्न नाही. मला सरकार महिन्याला फक्त ५ हजार देतं. मला ४ भाऊ, ३ बहिणी आहेत. वडिलांनी घेतलेल्या जागी आम्ही राहत होतो. पण आता आधीसारखं नाहीये.”

मिळालेल्या माहितीनुसार, ‘माहिमकर काका’ गिरगाव येथील सदाशिव लेन परिसरात राहतात. सध्या तिथे पुनर्विकासाचं काम सुरू असल्याने माहिमकर भाड्याच्या घरात राहतात. नवीन घराचा ताबा दोन वर्षांनी मिळणार आहे पण, थोरला भाऊ आणि वहिनी माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. विकासकाने खोलीचं भाडं फक्त आम्हालाच न दिल्याने सध्या भाड्याच्या घरात राहण्यासाठी पैसेही नाहीत. महिन्याचं १३ हजार भाडं भरण्यासाठी एफडी मोडावी लागली.”

हेही वाचा : Video : सलमान खानच्या ‘तेरे नाम’ चित्रपटाची हिरोईन २१ वर्षांनंतर ‘अशी’ दिसते; पतीसह साध्या लूकमध्ये दिसली भूमिका चावला

“सरकारकडून ५ हजार पेन्शन म्हणून मिळतात. पण, जेवण आणि औषधांसाठी १२ ते १५ हजारांपेक्षा जास्त खर्च येतो” असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून मिळणारी पेन्शन सुद्धा आता बंद झाल्यामुळे मनमोहन माहिमकर आर्थित संकटात सापडले आहेत. त्यांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे.

दरम्यान, मनमोहन माहिमकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी ‘ही पोरगी कुणाची’ चित्रपटात निर्मिती सावंत यांच्या भावाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘नटसम्राट’, ‘छत्रपती ताराराणी’, ‘नानामामा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘भिकारी’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘वंटास’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याबरोबरच अनेक मराठी-हिंदी मालिकांमध्येही ते झळकले होते.

Story img Loader