Ajinkya deo on Ramesh deo and his routine: अजिंक्य देव यांनी अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. अजिंक्य देव नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेऊ…
अजिंक्य देव यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत वडील रमेश देव यांची शिकवण आणि दिनचर्या याबाबत त्यांनी वक्तव्य केले.
“तेव्हा माझा अहंकार…”
वडिलांच्या अनुभवाचा करिअरमध्ये कसे फायदेशीर ठरलं? यावर अजिंक्य देव म्हणाले, “मला वाटतं की वडिलांच्या अनुभवाचे बोल ते गेल्यानंतर मी शिकलो. आज मला जाणवतंय की बाबा मला काय सांगायचे आणि मी काय करायला हवं होतं. पण, जेव्हा ते होते, तेव्हा माझा अहंकार जास्त होता. मला असं वाटायचं की मला अक्कल आहे, मी मोठा झालो. मी कशाला ऐकू, असं मला वाटायचं.”
“जेव्हा बाबा मला समजावयाचे तेव्हा मला शिंगं जास्त फुटलेली असायची. माझा मुलगा तसं आता करतो. मी जेव्हा विचार करतो की जेव्हा त्याची वेळ येईल, तेव्हा तो शिकेल.”
अजिंक्य देव पुढे म्हणाले, “आईने आमच्यावर फक्त प्रेम केलं. बाबा आम्हाला मार्गदर्शन करायचे. त्यांनी खूप चित्रपट केले. त्यांनी सर्ज्या, वासुदेव बळवंत फडके असे चित्रपट बनवला. त्यांना मला मोठं होताना पाहायचं होतं. ते मला सांगायचे की डान्स शिक, आणखी इतर गोष्टी शिक. पण, मी त्या गोष्टींना नाही म्हणायचो. मी त्यांना म्हणायचो की मी कशाला शिकू? मी अॅक्शन हिरो आहे, असं मला वाटायचं. मला आता असं वाटतंय की तोच मार्ग होता. या गोष्टींची जाणीव आपल्याला आपली एक पीढी गेल्यानंतर होते. तोपर्यंत आपण कारण नसताना. आपल्या अहंकारामध्ये असतो आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची जाणीव आपल्याला होत नाही.”
अभिनेते पुढे म्हणाले, “जर तुम्हाला असं कोणी मार्गदर्शन करणारे कोणी मिळत असेल, तर त्यांचे ऐका. नंतर तुम्हाला जे हवं ते करा पण ऐकून घ्या. कधी कधी असं वाटतं की तेव्हा त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित आज मी आजच्यापेक्षा मोठा असतो.
“त्यांच्या शिकवणीमुळे…”
पुढे अजिंक्य देव यांनी त्यांच्या दिनचर्येबद्दलही सांगितले. ते म्हणाले, “बाबांनी सांगितलेली एक गोष्ट मी अजूनही विसरलो नाही आणि मला वाटते की मला आजही फायदेशीर ठरते. ते म्हणालेले की अजिंक्य काम नसेन ना तरी सकाळी उठ, तयार हो आणि घराबाहेर पड. लोकांना भेट, बाहेर जा, घरात बसू नको. मला वाटतं की मी जो कोणी आहे, तो त्यांच्या शिकवणीमुळे आहे.”
“मला वाटतं आजच्या तरूण पिढीने हे केलं पाहिजे. आज कारण नसताना लोकांना नैराश्य येतं. त्यांना वाटतं की आयुष्यात काहीच होत नाही. आमच्याही आयुष्यात झालं नाही. त्यामुळे उठा आणि घराबाहेर पडा. तुम्ही विचार करून काहीच होणार नाही. बाहेर दहा लोकं भेटतील, त्यातूनही काहीतरी मार्ग निघेल आणि नाही झालं तरी दिवस गेल्यानंतर वाटेल की तुम्ही काहीतरी केलं आहे.”
‘अशी’ आहे अजिंक्य देव यांची दिनचर्या
“आजही माझं शूटिंग नसेल तरी मी सकाळी उठतो. मी फार लवकर उठत नाही. त्यानंतर मी साडे नऊ ते दहाच्या सुमारास ऑफिसमध्ये असतो. काम असो वा नाही. तिथे जे काही काम असेल ते काम करायचं. संध्याकाळी जीममध्ये जायचं. मी दररोज ५-६ किलोमीटर दररोज धावतो. मी वर्कआऊट करतो आणि त्यानंतर घरी येतो. मी मुंबईत किंवा पुण्याला असलो तरी माझी दिनचर्या अशीच असते.”
“मी जीमला गेलो नाही, वेळ नाही अशी कारणं सांगितली आहे, असं कधीच झालं नाही. जोपर्यंत काम करण्याची मानसिक तयारी करत नाही, तोपर्यंत कोणीही तुम्हाला घरबसल्या कोणीही काहीही देणार नाही. त्यामुळे तुम्हाला आयुष्याबरोबरच पुढे चालत राहावं लागतं”, असे म्हणत काही गोष्टी हातात नसतील तरी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, घरात बसून फक्त विचार करण्यापेक्षा बाहेर जाऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे, असे अजिंक्य देव म्हणाले.
