दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरकडे पाहिले जाते. ‘सैराट’ चित्रपटातील परश्या या पात्रामुळे तो घराघरात पोहोचला. आकाश ठोसर हा लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केलं आहे. त्याच्या या चित्रपटाच्या लूकचे प्रचंड कौतुक होत आहे. नुकतंच या लूकबद्दल त्याने भाष्य केले.
नुकतंच एका मुलाखतीत आकाश ठोसरला ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटाच्या लूकबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने “मी या पात्रासाठी प्रचंड मेहनत घेतलीय” असे सांगितलं. तसेच “मी यासाठी दीड वर्षे केस कापले नाही”, असेही तो म्हणाला.
आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट
“एखाद्या चित्रपटातील लूक हा त्या दिग्दर्शकावर अवलंबून असतो. माझ्या चित्रपटातील पात्राने असं दिसावं हे त्याने आधीच ठरवलेलं असतं. त्यामुळे या चित्रपटासाठी मला अण्णांनी या पात्रासाठी जेव्हा सांगितलं, त्यावेळी मी फिट होतो. मसल्स सिक्स पॅक्स असं मी छान स्वत:ला फिट केलं होतं. पण या पात्रासाठी अण्णांनी मला तू मला स्लिम फिट हवा आहेस असं सांगितलं. मला मसल्स वैगरे अजिबात दिसायला नको. चित्रपटाच्या नावाला तुझं पात्र कनेक्ट व्हायला हवं. त्यामुळे मी बॉडीवर काम केलं.
यानंतर लूकबद्दलही फार मेहनत घेतली आहे. मी या पात्रासाठी अनेक कपडे ट्राय केले आहेत. त्याबरोबर मी या पात्रासाठी आणि चित्रपटासाठी दीड वर्ष केस कापले नाहीत. मी जेव्हा अण्णांना विचारलं तेव्हा त्यांनी केस कापू नको असं सांगितलं होतं. आम्ही दोन दिवस आधी जेव्हा शूटींगच्या ठिकाणी भेटलो तेव्हा आम्ही थोडेसे केस कापले होते. त्यावेळी अण्णांना तो लूक आवडला होता. त्यानंतरच आम्ही शूटींगला सुरुवात केली”, असे आकाश ठोसरने सांगितले.
आणखी वाचा : “तुम्ही जे बोलता…” तेजस्विनी पंडितने नागराज मंजुळेंबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर आकाश ठोसरची प्रतिक्रिया
दरम्यान आकाश ठोसर हा लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.