मराठी सिने आणि नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना १४ जून रोजी नाट्यपरिषदेकडून गौरविण्यात आलं. शरद पवारांच्या हस्ते अशोक सराफ यांना नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर उपस्थित होते. यादरम्यान अशोक सराफांनी मनोगत व्यक्त करताना एक धमाल पोलिसांचा किस्सा सांगितला.

अशोक सराफ म्हणाले, “पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने फणसाळकरसाहेब भेटलेत. या जमातीने (पोलीस) माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय. कुठेही अडकलो असेल तर सोडतात. कुठे काहीही झालं तरी सोडतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्याला बरीच वर्ष झाली. एकदा मी गाडी चालवत होतो. माझ्याबरोबर आमचे डान्स मास्तर सुबल सरकार होते. ग्रँट रोडवरून स्लेटर रोड वळलो. त्यावेळी स्लेटर रोडवरून समोरून भरघाव वेगाने टॅक्सी आली. त्या टॅक्सीने एका माणसाला उडवलं. तेव्हा त्या माणसाचा खांदा फॅक्चर झाला. आता काय करणार? मी खाली उतरलो टॅक्सीवाल्याची चुकी त्याने लेफ्ट मारून त्या माणसाला उडवलं होतं. मी त्या जखमी माणसाला माझ्या गाडीत घातलं आणि भाडिया हॉस्पिटलला घेऊन गेलो. भाडिया हॉस्पिटलमध्ये अपघाताच्या केसेस घेत नाहीत. पण त्यांनी केस घेतली आणि त्याचं सगळं केलं.”

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

पुढे अशोक सराफ म्हणाले, “त्यावेळेला तिकडे डॉक्टर खेर होते. डॉक्टर खेर तुम्हाला माहित असतील उषा किरण यांचे पती. त्यांनी मला बघितलं आणि म्हणाले, तू आहेस मी बघतो. मदत करायला कोण-कोण तयार असतं बघा. काही वेळाने मी तिकडून जात होतो आणि तितक्यात पोलीस आले. पोलीस तेव्हाही माझे चाहते होते. मला म्हणाले, तुम्हाला माहितीये ना काय झालं. तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. म्हटलं, अरे बापरे. बरं चला येतो. ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दुपारी तीन वाजता मी गेलो आणि बसलो. पण यावेळी कोणी विचारेच ना. येतायत, बघतायत आणि जातायत. काही जण येतायत, हसतायत आणि जातायत. कोणीही विचारलं नाही. आता काय करायचं, मी आपला बसलोय. सात वाजेपर्यंत तसा मी बसलोच होतो. मला कुणीही विचारलं नाही. तुमचं काय झालंय वगैरे असं काहीही विचारलं नाही.”

“तेवढ्यात एक पोलीस उपनिरीक्षक होते. तिकडेच पोलीस स्टेशन जवळचं राहत होते. ते आले म्हणाले, एक विनंती आहे. मी म्हटलं, काय? माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे. एक वर्षाचा आहे. जरा येता का? तुमच्या हस्ते करूया. मी म्हटलं, माझं काय चाललंय बघा. मी कसा बसलोय बघा. तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलवताय. नाही, नाही…या म्हणून घेऊन गेले. मी तिकडे वाढदिवस केला. पेढा गोड वगैरे सगळं खाल्लं. म्हटलं आतातरी प्रक्रिया वेगाने होईल. नाही. परत येऊन मी खुर्चीवर बसलो. मी आणि माझ्याबरोबर सुबल सरकार होते ते. काय करावं काही कळतं नव्हतं.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आता ‘यांच्या’ हाती, आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते दिग्दर्शक

“जवळजवळ नऊ, दहा वाजले असतील. पोलीस स्टेशनचे जे मुख्य होते ते ड्युटीवर कुठेतरी बाहेर गेले होते. त्यावेळेस मुंबईमध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती येणार होती. त्यासाठी ते बंदोबस्ताला गेले होते. ते आले आतमध्ये. पोलीस स्टेशनला लागून ताडदेवची झोपडपट्टी आहे. पाठीमागे डोंगरावर ही झोपडपट्टी आहे. जवजवळ तीन हजार लोकं पोलीस स्टेशनमध्ये आले होते. कशाला? तर अशोक सराफला बघायला. मी इथे रडतोय, मी काय करू कळतं नाही म्हणून. ते पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी पाहिलं तीन हजार लोकं उभे आहेत खाली. ते म्हणाले, काय झालं? त्यांना वाटलं काहीतरी झालं वाटतं. पण त्यातील एक व्यक्ती म्हणाली, काही नाही, अशोक सराफ आलेत ना. ते बसलेत तिकडे त्यांना बघायला लोकं आलेत. त्यांनी चला…चला निघा करत सगळ्यांना जायला सांगितलं आणि मला देखील जायला सांगितलं,” असा किस्सा अशोक सराफ यांनी सांगितला.