नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना यासंदर्भातले तब्बल ५८ व्हिडीओ मिळाले आहेत. याप्रकरणानंतर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. याशिवाय अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना देखील करण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अतुल कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेक सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर ते आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतात. “जर ते पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात? शिवाय जे लोक पकडले जातच नाहीत त्यांचं काय?” असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी पोस्टद्वारे केला आहे.
अतुल कुलकर्णींची पोस्ट
पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’?
त्या आधी ते काय असतात?
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?ज्यावेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’,
तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-
भागीदार, पिडीत, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी,
भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?श्रद्धा, अंध कधी होते?
डोळस श्रद्धा म्हणजे काय?
डोळस आणि अंध श्रद्धां मध्ये अंतर किती असतं?
अंध होण्याला कारणीभूत कोण असतं?
करणारे की होणारे?
आंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी
असते की नसते?हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं
(कुठल्याही धर्माच्या)
तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का
(कुठल्याही पक्षाच्या)?

अतुल कुलकर्णींची ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खरातचा नाशिक शहरातील बंगला, कार्यालय आणि सिन्नर येथील शेतघराची झाडाझडती घेतली. त्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे, आठ लाखांची रोकड, दोन लॅपटॉप, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. खरातने स्वतःसह पत्नी कल्पना आणि मुलगी तृप्तबाला खरात तसेच नातेवाईकांच्याही नावांवर अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. त्यांची किंमत शेकडो कोंटीच्या घरात असल्याचा अंदाज आहे.
