Bhau Kadam On Stand-Up Comedy : स्टँपअप कॉमेडी शोमध्ये केले जाणारे विनोद, यामध्ये वापरली जाणारी आक्षेपार्ह भाषा, शिव्या हे सगळे मुद्दे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रणित मोरेच्या लाइव्ह शोदरम्यान एका तरुणाने महिलेबद्दल आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्या शोवर बंदी घालावी अशी मागणीही करण्यात येत आहे. यापूर्वी समय रैनाच्या शोवरून सुद्धा असाच वाद झाला होता. विनोद करण्याला सुद्धा मर्यादा, सामाजिक भान असावं अशी मतं नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनी मांडली आहेत. आता स्टँडअप कॉमेडी शोबाबत प्रसिद्ध अभिनेते व मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदवीर भाऊ कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाऊ कदम यांनी आजवर टेलिव्हिजनच्या अनेक गाजलेल्या कॉमेडी शोमध्ये काम केलेलं आहे. पण, त्यांच्या विनोदांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवलं. याशिवाय विविध कॉमेडी स्किटमधून त्यांनी हसतखेळत नेहमीच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सध्याच्या या स्टँडअप शोज ट्रेंडबद्दल त्यांचं मत नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…

भाऊ कदम मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “सध्या जो स्टँडअप कॉमेडीचा ट्रेंड सुरू आहे…तो तसाच सुरू राहणार आहे. आता हे असे स्टँडअप कॉमेडी शो बघायचे की नाही ते तुम्ही ठरवा. स्टँडअप शो पाहण्यासाठी जे प्रेक्षक जातात…ते लोक सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत पण, प्रत्येकाला काय आवडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर, मी अशा शिव्यांच्या कार्यक्रमात जाऊ शकत नाही. पण, मी सगळ्याच कार्यक्रमांना वाईटही म्हणणार नाही. प्रत्येकाला जे आवडतं ते त्याने करावं.”

“महत्त्वाचं म्हणजे जे कलाकार खरंच कौतुक डिझर्व्ह करतात…त्यांचं आवर्जून कौतुक करा. बरेच असे स्टँडअप कॉमेडियन आहेत, ज्यांचे शो चांगले सुरू आहेत. ते लोक चांगले पैसेही कमवत आहेत…ही त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण, प्रश्न आहे सामाजिक भान असण्याचा आणि ते जपण्याचा…स्टँडअप कॉमेडीचे शो मी माझ्या कुटुंबाला दाखवू शकत नाही. मी कदाचित चांगला एखादा स्टँडअप शो पाहण्यासाठी एकटा मित्रांबरोबर जाईन पण, कुटुंबाबरोबर नाहीच.” असं मत भाऊ कदम यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, भाऊ कदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वीच ते ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमात झळकले. याशिवाय भाऊ सध्या ‘सिरियल किलर’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. लवकरच भाऊ कदम आणि निलेश साबळे एका सिनेमात सुद्धा एकत्र झळकणार आहेत.