Digamber Naik Statement On Dashavatar Movie : ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ हा लोकप्रिय मराठी सिनेमा गेल्यावर्षी, १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. ‘दशावतार’ थिएटरमध्ये प्रदर्शित होताच प्रचंड यश मिळवीत सुपरहिट ठरला.
‘दशावतार’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना ‘दशावतार’चा खेळ आवडला. कोकणातल्या बाबुली मेस्रीची ही गोष्ट रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. या सिनेमाबद्दल आता दिगंबर नाईक यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
“कोकणातला असूनही मला ‘हापूस’मध्ये घेतलं गेलं नाही”
’राजश्री मराठी’शी साधलेल्या संवादात दिगंबर नाईक यांना मालवणी माणूस म्हणून सन्मान कधी करण्यात आला याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर दिगंबर नाईक म्हणाले, “मला आता ‘वस्त्रहरण’ नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलं. मालवणी मालिकेत आणि मालवणी सिनेमातच मालवणी लोक नको असतात. ‘हापूस’ नावाचा सिनेमा आला, त्यात फीलर्स म्हणून डबिंग आणि गाऱ्हाणं भरून दिलं. तेव्हा कोकणातला असूनही मला ‘हापूस’मध्ये घेतलं गेलं नाही, असं त्यांना म्हणालो होतो. पण, कधी कधी काही गोष्ट होत नाहीत.”
“‘दशावतार’मध्ये जे दाखवलं गेलं, ते अपमानित होण्याइतकं…”
पुढे ते म्हणाले, “‘दशावतार’ सिनेमा आला तेव्हाही मला अनेकांनी कॉल केले होते. त्यात तू कसा नाहीस? असं त्यांनी विचारलं. पण, कदाचित त्यांना मला घ्यावंसं वाटलं नसावं किंवा ते मला ओळखत नसावेत. नाही तर मला घेतल्यानं काही फरक पडत नाही, असं त्यांना वाटलं असेल. ‘दशावतार’चं कोकणात खूप वलय आहे; पण सिनेमा आला आणि त्यात दशावतार दाखवलाच नाही. मला विचाराल, तर त्या सिनेमात जे दाखवलं गेलं, ते अपमानित होण्याइतकं दाखवलं गेलं.”
त्यानंतर दिगंबर नाईक कोकणातील दशावताराबद्दल म्हणाले, “दशावतार बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. याचमुळे शिक्षकांचा सर्वांत जास्त मार खाल्ला. कारण- दशावतार बघून शाळेत झोप काढायचो. दशावतारने हिंदू पुराण, हिंदू संस्कृती दाखवली. दशावतारमुळेच हिंदू देव-देवता आम्हाला माहिती आहेत. दशावतार ही यक्षगाननंतर हिंदू संस्कृतीतली कला आहे. ते बघून आम्ही मोठे झालो तरीसुद्धा कोकणात असं म्हणायचे, ‘रात्रीचो राजा आणि सकाळी कपाळीवर बोजा.’ कारण- ते डोक्यावर पेटी घेऊन फिरायचे. आता गाड्या आणि बस आल्या.”
“दशावतारमध्ये राजा म्हणून एखादा कलाकार राजा बनून आला की, तो राजाच वाटायचा, शंकर बनून आले की शंकरच वाटायचे, हनुमान बनून आले की हनुमानच वाटायचे. कोणतीही संहिता नसताना संस्कृत वाचून कोणतीही रिहर्सल न करता, ते दशावतार करायचे. आता तीन-तीन महिने तालीम करून नाटकाला उभे राहिले तरी फंबल पडतात. ग्रेट आहे ना दशावतार… तरीसुद्धा त्यांना नावं ठेवली जायची, मग आम्ही कोण?”
पुढे त्यांनी स्वत:च्या संघर्षबद्दल सांगितलं. “आई-वडिलांची इच्छा म्हणून मी इथवर आलो. तसेच भाऊ-बहीण आणि नातेवाइकांसह सर्वांचे आशीर्वाद आहेत. त्यांनी थेट साथ दिली नसली तरी त्यांचा कायमच पाठिंबा होता”, असे शेवटी दिगंबर नाईक म्हणाले.
