Marathi Actor On His Financial Crisis : मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे दिगंबर नाईक. सध्या ते एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्यांनी स्वत:चा संघर्षकाळ सांगितला. याचवेळी त्यांनी स्वत:वर पावणे दोन कोटींचे कर्ज असल्याचाही उल्लेख केला.
पावणे दोन कोटींचे कर्ज असतानाही आयुष्य जगणं सुसह्य आहे का? असं दिगंबर यांना विचारण्यात आलं. यावर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिगंबर नाईक म्हणाले, “ते तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही. मला शून्यातून विश्व निर्माण करायचे आहे. मला चांगल्या घरात राहायचे आहे; तर चांगले पैसे द्यावे लागणार आणि यासाठी मला कर्जच काढावं लागणार. कारण माझ्याकडे काही बँक बॅलेन्स नाही. कर्ज फेडायला जमलं नाही, तर मी घर विकून टाकेन. सगळ्यांवर कर्ज आहे, देशावरही कर्ज आहे.”
“सुरुवातीला नवरा-बायको असतात, तेव्हा लहान घर असतं. मग मुले झाल्यानंतर आपण आणखी मोठे घर घेतो. ही एक गरज आहे. त्यासाठीच कर्ज घेतलं. पण नंतर कर्ज वाढलं. कोविड आला, मध्यंतरी नोटबंदी झाली आणि यामुळे कर्ज वाढत गेलं. कर्ज वाढतच जातं. अनेकांवर कर्ज असणार, फक्त बोलतोय हा दिगंबर नाईक”, असेही ते म्हणाले.
त्यानंतर ते म्हणाले, “फू बाई फू नंतरही असे दिवस बघितले आहेत, की ज्यावेळी माझ्या खिशात फक्त दोन रुपये होते. पैसे नसल्याने मी अनेकदा चालत प्रवास केला आहे. याला आता लोक ‘संघर्ष’ म्हणतात. पण एखादा श्रीमंत माणूस जेव्हा संध्याकाळी गार्डनमध्ये एक तास चालतो, तेव्हा कोणी बोलत नाही तो एक तास चाललाय. असा माझा दृष्टीकोन आहे. या सगळ्यामुळे मला काही फरक पडत नाही. मला कोणत्या गोष्टीची लाज वाटत नाही. आजही मी दळण घेऊन येतो. आजही भाजी मीच आणतो. मासे वगैरे घ्यायला स्वत: मीच जातो. मला सेलिब्रिटी असल्याचे काही वाटत नाही. जे कर्ज आहे ते नक्कीच फिटेल. सातत्याने काम असेल तर कर्ज फिटत जातं.”
शेवटी त्यांनी पैसे बुडाले असल्याचेही सांगितले. याबद्दल ते म्हणाले, “मला काही लोकांनी कामाचे पैसेच दिलेले नाहीत. आम्ही अभिनय करतो; पण आम्हाला अनेकजण पैसेच देत नाहीत. यावर आता काय करणार? रडणार का? दोन-तीन वर्षे झालीत. आता काय पैसे मागणार. आतापर्यंतचे कामाचे एकूण पैसे मोजायचे झाले तर, जवळपास १५-१७ लाख रुपये बाकी असतील. देतो, नंतर बघू, अजून आलेच नाहीत असं म्हणून पैसे बुडाले आहेत. पण ठीक आहे. मिळायचे तेव्हा मिळतील. या काळात बरेच मित्र कामाला आले. अनेकांनी संकटाच्यावेळी मदत केली.”
