Marathi Actor Hrishikesh Kanade Passed Away : मराठी नाट्यसृष्टीवर आणि कलाविश्वावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हुशार, अभ्यासू आणि हुरहुन्नरी मराठी अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले आहे. ३ ऑगस्ट रोजी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ऋषिकेश यांच्या अकाली जाण्याने मराठी सिनेसृष्टी, नाट्यभूमी आणि त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या ऋषिकेश यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली होती.
थिएटर इंडिया कंपनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ऋषिकेश कानडे यांचा एक व्हिडीओ शेअर करून ऋषिकेश यांच्या निधनाची माहिती दिली आहे. “आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होतंय की ‘कॉल ऑफ ड्युटी’ आणि ‘नूर मंझिल’चा मुख्य अभिनेता ऋषिकेश कानडे यांचं निधन झालं आहे. काल तो आम्हाला सोडून गेला. या दुःखातून सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ऋषिकेश फक्त एक उत्तम अभिनेताच नव्हता, तर एक प्रेमळ मित्र, संवेदनशील माणूस आणि आपल्या अभिनयाने रंगमंचावर प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडणारा कलाकार होता.
पाहा पोस्ट
या कठीण प्रसंगी आम्ही प्रार्थना करतोय. त्याचे कुटुंब, मित्रपरिवार व जवळच्या लोकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, आणि त्याच्या आत्म्यास शांती लाभो. ऋषिकेश, तुझी उणीव नेहमी भासत राहील, पण तुझी कला आणि तुझ्या आठवणी सदैव आमच्याबरोबर राहतील,” अशी पोस्ट थिएटर इंडिया कंपनीने केली आहे.
ऋषिकेश कानडे यांनी ‘मी भारतीय’ या नाटकाचे जवळपास ३०० प्रयोग केले होते. या नाटकातून त्यांचे देशप्रेम पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर ते उत्तम व्याखाने द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्याने देताना ते इतिहासातील प्रसंग जिवंत करत असतं. उत्तम अभिनेते व प्रभावी वक्ते असलेल्या ऋषिकेश कानडे यांच्या अभिनयाची दखल राज्यस्तरावरही घेण्यात आली होती. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना सलग दोन वर्षे अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले होते.
ऋषिकेश कानडे अभिनयाबरोबरच स्वतःचा ऑनलाइन फिटनेस क्लबही चालवत होते. ते पुण्यात राहायचे. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण आणि पत्नी असा परिवार आहे.
