"मराठी माणसाने कष्टाचे पैसे..." जितेंद्र जोशीची 'ती' पोस्ट चर्चेत | marathi actor jitendra joshi share post for sunny marathi movie nrp 97 | Loksatta

“मराठी माणसाने कष्टाचे पैसे…” जितेंद्र जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“हे सगळं तुम्हालाही दिसेल”

“मराठी माणसाने कष्टाचे पैसे…” जितेंद्र जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या मराठी चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अनेक चित्रपटगृहात मराठी चित्रपटाला दुय्यम स्थान दिलं जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद असतानाही अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटासाठी अनेक शो रद्द केले जात असल्याचे दावा कलाकार करत आहे. याप्रकरणी अभिनेता जितेंद्र जोशीने संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अभिनेता जितेंद्र जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात सनी हा चित्रपट प्रदर्शित झाला. याच निमित्ताने जितेंद्र जोशीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने हेमंत ढोमेच्या सनी या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.
आणखी वाचा : “तिला तुम्ही नक्कीच डोक्यावर घ्या पण…” सुरेखा पुणेकरांचा सणसणीत टोला

जितेंद्र जोशीची पोस्ट

“गोदावरी पाठोपाठ लगेच एका आठवड्यात माझ्या मित्रांचा #सनी सिनेमा आला जो मी काल पाहिला. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग या दांपत्याची निर्मिती असलेला दुसरा सिनेमा. झिम्मा च्या यशानंतर पुन्हा स्वतः चे पैसे घालून बनवलेला हा चित्रपट एका आडमुठ्या , बेजबाबदार मुलाची समंजस आणि जबाबदार होण्याच्या प्रक्रियेची गोष्ट सांगतो. ती सांगताना लेखिका इरा कर्णिक आणि दिग्दर्शक हेमंत सरळ साधी तरीही आंतरिक मांडणी करतात. सोबतीला सगळे कलाकार अत्यंत साधं तरीही समर्पक काम करतात आणि ते आपल्या पर्यंत पोहोचतं. झिम्मा , आनंदी गोपाळ, मिडीयम स्पायसी सारखे सिनेमे लिहिणारी हीच का ती लेखिका जी पारगाव ची भाषा आणि नाती इतक्या सहजतेने सांगते असा प्रश्न पडतो.

हेमंतची ही आजवरची बेश्ट फिल्म आहे. दिग्दर्शक म्हणून आणि निर्माता म्हणून सुद्धा. क्षिती जोग ही कुठली ही भूमिका कधीही उत्तमच करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. चिन्मय मांडलेकर इतक्या सहजतेने बारीक काम करून जातो आणि असा दादा आपल्याला असता तर फार बरं झालं असतं असंही वाटतं . ललित प्रभाकर हा देखणा हिरो फक्त देखणा नसून किती सुंदर नट आहे हे मिडीयम स्पायसी नंतर पुन्हा एकदा लक्षात आणून देतो. या सिनेमाचं पार्श्वसंगीत आणि गाणी ही जमेची बाजू आहे आणि त्यात अत्यंत मोलाचं काम क्षितिज पटवर्धन या आमच्या गीतकार मित्राने केलंय.

हे सगळं तुम्हालाही दिसेल ; जर तुम्ही सिनेमागृह जाऊन हा सिनेमा पाहिला तर!! गोदावरी ला जितका प्रतिसाद तुम्ही दिला/ देताय तसा या चित्रपटाला सुद्धा द्या. शो कमी आहेत मान्य! कारण हिंदी चित्रपट जोरात चालतोय हे ही मान्य!! परंतु आपला मराठी सिनेमा आणि त्यात आपल्या मराठी माणसाने स्वतः चे कष्टाचे पैसे टाकून बनवलेला वेगळा सिनेमा चालवण्याची जबाबदारी घेऊया. कृपया थोडे कष्ट घ्या आणि चित्रपट गृहात जाऊन सनी बघा ही विनंती.”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मला वेड लागलं…” अक्षय कुमारची रितेशसाठी खास मराठीत पोस्ट

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ सनी ‘ चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 20:19 IST
Next Story
महेश मांजरेकरांच्या लेकाने त्याच्या आईसाठी केली खास पोस्ट; म्हणाला…