आपल्या मुलांनी आयुष्यात खूप नाव कमवावं, मोठं व्हावं अशी प्रत्येकाच्या आई-बाबांची इच्छा असते. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकारांची मुलं देखील सध्या विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री किशोरी गोडबोलेची लेक सई गोडबोले ही इंटरनॅशनल ब्रँडच्या जाहिरातीत झळकल्याचं समोर आलं होतं. आता त्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते मंगेश देसाई यांचा मुलगा नुकताच पदवीधर झाला आहे. यानिमित्ताने, लाडक्या लेकासाठी खास पोस्ट शेअर करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

मंगेश देसाईंची लेकासाठी पोस्ट

मी कधीच भूतकाळाकडे बघत नाही. पण आज अचानक थोडासा डोकावलो. साहिलच्या “अरुणोदय पब्लिक स्कूल, ठाणे’ येथील प्रवेशाचा दिवस आठवला १७ वर्षे झाली… आणि पान उलटत गेली. खरंतर माझा या क्षेत्रातला संघर्ष आणि त्याचा शिक्षणातला प्रवास दोन्ही समांतर होतं. माझ्या करिअरमधील उतार-चढाव आणि त्याचे शिक्षणातले. तो दहावीच्या परीक्षेत उत्तम मार्कांनी पास झाला आणि माझी चिंता मिटली. तो बारावी उत्तम मार्कांनी पास झाला मी निश्चिंत झालो, त्याचं NMIMS मध्ये Admission झालं आणि मी निर्धास्त झालो. तेव्हा मला एक जाणवलं… माझ्या दादांचं पण माझ्या बाबतीत असंच झालं असेल. आज माझा मुलगा डिग्री घेत असताना त्या गोष्टी पुन्हा जाणवल्या. स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत माझं वय वाढतंय हे जाणवत होतं पण, या धावपळीत मुलगा मोठा झाला… आता पुढे तो त्याचं आयुष्य जगायला हळुहळू सुरुवात करेल, पुढच्या शिक्षणाला कुठे तरी बाहेर पडेल, मग? खरंतर मी अस्वस्थ झालो. पण, नंतर विचार केला हीच भावना माझ्या दादांची पण होती. त्यांनी माझं आयुष्य मला घडवण्याची संधी दिली होती. मला पण तेच करायला पाहिजे…असे अनेक विचार येत असताना माझा फोन वाजला.
अरे कुठे आहेस? येतो आहेस ना मीटिंगला?
साहिलला भेटून अभिनंदन करून काहीही न खाताच निघालो…
पुन्हा धावपळ करावीच लागणार ना! अजून त्याचं PG व्हायचं आहे…पण, ही सगळी एनर्जी त्याच्या मुळेच मला येते.
त्याच्या या शिक्षण प्रवासात त्याचे शिक्षक अरुणोदयचे राजेश सर, राणे सर, जयंत सर, कुलकर्णी सर, देवयानी मॅडम, फिरके सर, सचिन जोशीसाहेब, कवले सर, प्रभाकर साहेब, संदीप शिंदे साहेब, उदय सावंत सर, राहुल गेठे सर, एकनाथ शिंदे साहेब आणि NMIMS चे संस्थापक अमरीश पटेल सर या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि ते पुढेही असेच असू द्या…
साहिलला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा!

दरम्यान, मंगेश देसाई यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत साहीलला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच मंगेश देसाई ‘बंडखोर’ सिनेमात झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.