“काम हीच एनर्जी” असं म्हणत मराठी सिनेसृष्टीवर दोन दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांची लोकप्रियता तुफान होती. त्यांच्याबरोबर आयुष्यात एकदातरी काम करायला मिळावं अशी इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असायची. असाच एक अनुभव अभिनेते प्रभाकर मोरेंनी सांगितला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारख्या अनेक कॉमेडी शोजमधून प्रभाकर मोरे घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर त्यांनी अनेक सिनेमे व नाटकांमध्येही काम केलेलं आहे. नुकत्याच ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत प्रभाकर मोरेंनी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवण सांगितली आहे.
प्रभाकर मोरे म्हणाले, “२००३ मध्ये मला लक्ष्मीकांत बेर्डें यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. एका मालिकेत आम्ही काम करत होतो. लक्ष्मीकांत सर त्या मालिकेत क्लर्क होते आणि मी शिपाई होतो. ती मालिका टीव्हीवर आली नव्हती. त्यावेळी सेटवर त्यांना पहिल्यांदा पाहून मी फार भारावून गेलो होतो. कारण, कोकणात गावी शाळा-कॉलेजमध्ये असताना आम्ही मोठ्या स्क्रीन्स लावून लक्ष्मीकांत बेर्डेंचे सिनेमे पाहायचो. दिग्दर्शकाने माझी आणि त्यांची भेट करून दिली.”
प्रभाकर मोरे पुढे म्हणाले, “रिडिंग सुरू झाल्यावर मी स्क्रिप्टप्रमाणे कोकणातील भाषा बोलत होतो. तेव्हा त्यांनी माझी भाषा-रिडिंग ऐकून दोनदा-तीनदा माझ्याकडे पाहिलं आणि मग विचारलं…काय रे…तू कुठला आहेस? मग मी म्हणालो, चिपळूणचा आहे…तसे ते पटकन म्हणाले, ‘अरे माझ्या गाववाला आहेस…’ त्यानंतर चार दिवस आम्ही एकत्र खूप छान काम केलं.”
“शूटिंगदरम्यान ते कधीही सुपरस्टार असल्यासारखं वागले नाहीत. त्यांनी प्रत्येक गोष्ट मला शांतपणे समजावून सांगितली. दररोज आपुलकीने विचारायचे तुला आजचे पैसे वगैरे मिळाले का? नसेल तर मला सांग. त्यांच्याबरोबर काम करता आलं हीच मोठी गोष्ट आहे, ती मालिका टीव्हीवर आली नव्हती. मनापासून सांगतो, माझ्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ‘देवमाणूस’ आहेत. त्यांचं काम बघून आम्ही खूप काही शिकलो.” असं प्रभाकर मोरेंनी सांगितलं.
दरम्यान, ‘कोकणचे पारसमणी’ अशी एक वेगळी ओळख त्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने मिळवून दिली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रभाकर मोरे यांचा चाहतावर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अवघ्या जगभरात आहे. परदेशातही त्यांचे लाखो चाहते आहेत.
