मराठी सिनेसृष्टीतील सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने आपल्या दमदार अभिनयाबरोबर दिग्दर्शनानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकताच त्याचा ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रसादच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओकने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी दोघांनी लग्नातील एक गंमतीशीर किस्सा सांगितला.
अभिनेता प्रसाद ओक किस्सा सांगत म्हणाला, “लग्न झालं तेव्हा माझं नाटक चालू होतं. राजा गोसावी यांचं ‘भ्रमाचा भोपळा’ नावाचं नाटक करत होतो. लग्नाच्या आदल्या दिवशीही प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी देखील तीन प्रयोग होते. तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे करायला लागणार काही पर्याय नाही. तर आदल्या दिवशीचा प्रयोग संपवून मी लाल डब्याच्या एसटीने पुण्याला गेलो आणि थ्री फोर्थ पॅन्ट घातली होती. मला पूर्ण कपडे आवडतच नाहीत. थ्री-फार्थ, सिव्हलेस शर्ट असा माझा वेश असतो. मी तसाच कार्यालयात गेलो. तर हिची आई दरवाजात वाट बघत होती, मी कधी येतोय.”
त्यानंतर मंजिरी ओकने सांगितलं, “७ तारखेला लग्न होतं. ६ तारखेला हा कार्यक्रम होता आणि संध्याकाळी ५ वाजले तरीही हा आलाच नव्हता. म्हणजे सगळे कार्यक्रम सुरू होणार होते. नातेवाईक येत होते. पुढे सांग.”
मग पुढे प्रसाद म्हणाला की, मी आलो आणि त्या (सासूबाई) म्हणाल्या, ‘तुम्ही आला का…तयार व्हा.’ तर माझी खेचायची सवय आहे. त्यामुळे मी म्हटलं की, तयार काय व्हायचं. मी असंच येणार आहे. त्यानंतर त्या आतमध्ये जाऊ रडायला लागल्या. अगं ते लग्नाला अर्ध्या पॅन्टमध्ये उभे राहणार आहेत, असं मंजिरीला सांगू लागल्या.
मग मंजिरी किस्सा सांगितला, “आई म्हणाली, अगं ते एवढे कपडे घेतलेत. आता ते मग काय करायचे? लोक काय म्हणतील मंजू? आपल्या गावाकडचे लोक आहेत. अगं ते अर्ध्या पॅन्टमध्येच उभे राहणार म्हटलेत. मी म्हटलं, आई अगं ती थ्री-फार्थ आहे. दुसरं म्हणजे तो असा राहणार नाही. ती म्हणाली, तू पहिलं खाली चल…तू त्यांना काय ते सांग.”
यानंतर प्रसाद ओकने अजून एक लग्नाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, “आजकाल लग्न मॅरेज हॉल वगैरेमध्ये होतात. हॉलमध्ये लग्न होणं हे पुर्वापारपासून चालत आलं आहे. आमचं लग्न दुकानात झालं. कुठल्याही मंगल कार्यालयाला एक गेट असतो ना. आमच्या मंगल कार्यालयात शटर होतं. त्यामुळे मी म्हटलं आपलं लग्न दुकानात आहे.”
हेही वाचा – “मला कुठलाही भयंकर आजार झालेला नाही”, सुशांत शेलारने वजन घटण्यामागचं सांगितलं नेमकं कारण, म्हणाला…
पुढे मंजिरी ओक म्हणाली, “मी म्हटलं त्याला तुला शटर उघडायला लागलं का? ते आधीपासून उघडलेलंच आहे ना आणि मोठा हॉल होता. तो पुण्यातला प्रसिद्ध हॉल आहे. अनेक वर्षांचा तो जुना हॉल आहे. हा जे सांगतोय जुना हॉल वगैरे. पण उलट आपल्या लग्नाच्या वेगळीस त्यांनी रिनोव्हेट केला होता. नवाकोरा केला होता. पण हा तेव्हापासून मला बोलतो आपलं लग्न दुकानात झालंय.”