Prasad Oak Wife 12 Jyotirlinga Yatra : मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगं किंवा काही आठवणी शेअर करत असतात. अशातच लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीनं ज्योतिर्लिंग यात्रेचा अनुभव शेअर केला आहे.
मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या पत्नीनं नुकतीच ज्योतिर्लिंग यात्रा केली. या यात्रेची प्रत्येक अपडेट ती आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत होती. अशातच तिची ही ज्योतिर्लिंग यात्रा संपूर्ण झाली असून शेवटचं ज्योतिर्लिंग दर्शन केल्यानंतर तिनं व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी दोघे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. दोघे एकमेकांबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतात. दोघे विविध ट्रेंडसुद्धा फॉलो करताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो.
प्रसाद आणि मंजिरी यांनी यावर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या ज्योतिर्लिंग यात्रेला सुरुवात केली. यानंतर एकेक करत मंजिरीनं सर्व ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आणि अखेर गुजरातच्या सोमनाथ दर्शनानं तिनं ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली. या शेवटच्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मंजिरीला तिच्या मोठ्या लेकचीही साथ लाभली.
ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण होताच मंजिरीनं तिच्या भावना व्यक्त करीत म्हटलं, “अश्या रितीनं माझी ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण झाली. यावेळी म्हणजे सोमनाथ दर्शनाला माझा मोठा मुलगा सार्थकही बरोबर होता. हा एक वेगळा आनंद. या संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रेचा अनुभव फारच कमाल होता विलक्षण आणि कधीही विसरता न येणारा आहे. महादेवाच्या कृपेनं हे व्रत पार पडलं. हर हर महादेव.”
दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओक त्र्यंबकेश्वरला पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी मंजिरीदेखील उपस्थित होती. मंदिरात दर्शन घेतानाचा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्र्यंबकेश्वरपासून मंजिरीनं ज्योतिर्लिंग यात्रेची सुरुवात केली होती. मंजिरीनं तिची ही ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
मंजिरीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आदिनाथ कोठारेनं हार्ट इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. तर स्वप्नील जोशीनं ‘शाब्बास मंजू तुझा अभिमान आहे’, अशी कमेंट केली आहे. अमृता खानविलकरही मंजिरी तुझा अभिमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर प्रसाद ओक या व्हिडीओवर कमेंट करीत म्हणालाय “मंजू… तुझं प्रचंड कौतुक आहे. खूप खूप प्रेम. हर हर महादेव.”
