Satish Pulekar on Friendship with Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि लोकप्रिय मराठी अभिनेते सतीश पुळेकर यांच्यातील मैत्री ही एकेकाळी संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होती. संघर्षाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यापासून ते एकमेकांच्या घरी एकत्र जेवण्यापर्यंतच्या अनेक आठवणी नाना पाटेकर यांनी नेहमीच शेअर केल्या आहेत. आता सतीश पुळेकरांना नाना पाटेकरांबरोबरच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं.

‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटे यांनी विचारलं, “एकेकाळी नाना पाटेकर आणि तुमची खूप मैत्री होती, त्याचे अनेक किस्से आहेत.” त्यावर पुळेकर म्हणाले, “हो. मित्र…जरा कठीण आहे. कारण माझे मित्र या क्षेत्रातले नाहीत. फक्त विनय आपटे या क्षेत्रातला मित्र. म्हणजे बाकीचे मित्र आहेत. शाळेतले, कॉलेजमधले आहेत. एक माझा चौथीपासूनचा मित्र आहे. तो नेहमी येतो माझ्याकडे. तसेच विजय क्लबमधले मित्र आहेत.”

पुढे सौमित्र पोटे यांनी सतीश पुळेकरांची परवानगी घेत प्रश्न विचारला. तुमचं आणि नाना पाटेकरांचं काय झालंय? तुमचं खूप चांगलं कनेक्शन होतं ना? यावर सतीश पुळेकर म्हणाले, “नाही. मला असं वाटतं की… मला माफ करा हा विषय नको, त्याचं कारण असं की एवढी चांगली मैत्री होती ती संपली. ज्यावेळी अविष्कारमध्ये मी होतो, त्यावेळी जयदेव हट्टंगडी एका एकांकिकेचं दिग्दर्शन करत होते. जी पु. ल. यांच्या ‘म्हैस ‘या कथेवर आधारित होती. त्यात मी रोल करत होतो आणि बरीच मंडळी होती. मला जयदेव म्हणाले की ‘सूत्रधाराच्या भूमिकेसाठी कोणी असेल तर बघ ना.’ मी म्हटलं की ‘मी आणतो’.”

पुढे सतीश पुळेकर म्हणाले, “आता गंमत अशी की नाटकात येण्याआधी मी नानाकडे असायचो किंवा नाना माझ्याकडे असायचा, नाहीतर तो माझ्या क्लबच्या इथे यायचा. आम्ही एकांकिका करायचो. गजानन गोखलेंनी नाट्यकेदार नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेत सुनील जोशी, उदय म्हैसकर, मी आणि नाना आम्ही एकांकिका करायचो. तिथे नानाला मी घेऊन गेलो होतो. अविष्कारमध्येही मीच घेऊन गेलो होतो.”

“तो सतत ‘मला काम करायचंय, मला रोल करायचाय’ असं मला सांगत असायचा. मग मी म्हटलं नाना ये इथे. मग मी जयदेवकडे त्याची ओळख करून दिली. त्या एकांकिकेचे फक्त दोनच प्रयोग झाले. मग नाना तिथे राहिला. पहिलं गौराई नावाचं एक नाटक होतं, राज्य स्पर्धेसाठी.. त्यात त्याने काम केलं आणि मग त्याचं सगळं सुरू झालं,” असं सतीश पुळेकर म्हणाले.

सतीश पुळेकर व नाना पाटेकर यांची घट्ट मैत्री होती. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी एकमेकांबरोबर खूप वेळ घालवला. ‘मी मुद्दामहून जेवणाच्या वेळी सतीश पुळेकरांच्या घरी जायचो. सतीश घरी नसायचा, तरी त्याची आई जेवून जा असं म्हणायची,’ असं नाना पाटेकर संघर्ष काळाची आठवण सांगत एका मुलाखतीत म्हणाले होते.