ज्येष्ठ मराठी अभिनेते सतीश पुळेकर यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याचबरोबर त्यांनी बऱ्याच जणांना अभिनयाचे धडे दिले. त्यांच्याकडे अभिनय शिकलेले पुढे मोठे कलाकार झाले. पण त्यांच्यापैकी कुणाचंच नाव सतीश पुळेकर घेत नाहीत. यामागचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे. “मी ज्या लोकांना तयार केलं, त्यांनी कधीच माझा विचार केला नाही,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
सतीश पुळेकर यांनी ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सांगितलं की ते सिद्धार्थ कॉलेजला जायचे. तिथे ३०-३५ मुलांना त्यांनी नाटक कसं करायचं ते शिकवलं. पण त्यापैकी एकाही विद्यार्थ्याचं नाव त्यांनी घेतलं नाही. त्याबद्दल सौमित्र पोटे यांनी त्यांना विचारलं. “आपल्या हाताखालून कोण विद्यार्थी गेले, याचा शिक्षकाला गर्व असतो. पण तुम्ही जे विद्यार्थी घडवले, जे आता कदाचित मोठे कलाकार असतील, त्यांची नावं तुम्हाला का घ्यावीशी वाटत नाही?” असं विचारण्यात आलं.
कोणीही मागे वळून पाहिलं नाही – सतीश पुळेकर
सतीश पुळेकर उत्तर देत म्हणाले, “नाही घ्यावीशी वाटत, त्याचं कारण असं की आपण शाळा शिकल्यानंतर शाळेतल्या गुरुजींचं काय झालं? याचा फार विचार करत नाही. मी माझ्याबाबतीत सांगतो की, जेव्हा मला शाळेतील गुरुजी भेटायचे तेव्हा त्यांची सखोल चौकशी करायचो. तुम्ही काय करता? तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? असं विचारायचो. मी प्रत्येक गुरुजींची चौकशी करण्याचा प्रयत्न करायचो. पण आता असं होतंय की मी जी माणसं तयार केलीत, मुली तयार केल्या, त्यांनी परत मागे वळून पाहिलं नाही. की बाबा तू मेला आहेस की जिवंत आहेस, तुझे काही प्रॉब्लेम्स आहेत का, तुला पैशांची अडचण आहे का, असं विचारलं नाही.”
तर मी उगीच त्यांची नावं का घेऊ? सतीश पुळेकर
पुढे ते म्हणाले, “माझं दर आठवड्याला एक नवीन नाटक येतंय किंवा सिनेमा लागतोय, त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे असंही काही नव्हतं. पण कोणीही फिरकलं नाही. जी माणसं मी तयार केलीत, त्यांनी स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे, सिनेमे केलेत, पण माझा कधीच विचार केला नाही. माझा त्यांच्यावर राग नाही. त्यांनी खूप मोठं व्हावं, अशी माझी इच्छा आहे. पण असं वाटतं की जर तुम्हाला माझी किंमतच नसेल किंवा आठवणच येत नसेल, तर मी उगीच तुमची नावं का लोकांना सांगू?”
सतीश पुळेकर यांनी दिलं उदाहरण
सतीश पुळेकर यांनी एक उदाहरण देऊन त्यांचं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला. “काही वेळेला कुणीतरी येतं आणि सांगतं की, अरे त्याने तुझं नाव घेतलं आणि सांगितलं की ते आमचे गुरू आहेत. मग मी त्यांना उदाहरण देतो. समजा- माझे वडील चुकीचे असते, वाईट असते, आईशी चांगले वागले नसतील तर मला त्यांचा राग येणं स्वाभाविक आहे. मग मी त्यांचं नाव घेणार नाही. पण ज्यावेळेला कुणीतरी माझं संपूर्ण नाव विचारतं त्यावेळी मला ते नाव घ्यावच लागतं. तसंच या बाबतीतही होतं. मी कोणाला दोष देणार नाही, हा माझ्याच नशिबाचा दोष आहे,” असं सतीश पुळेकर म्हणाले.
