Shashank Shende in Ghabadkund Marathi Movie : मराठी कलाविश्वात गेल्या महिन्याभरात अनेक वैविध्यपूर्ण सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता जून महिन्यात आणखी एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या भव्य आणि रहस्यमय सिनेमाचं नाव आहे ‘घबाडकुंड’. याच चित्रपटासंदर्भातील एका फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. संपूर्ण टक्कल, कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि या ज्येष्ठ अभिनेत्याच्या डोळ्यात गूढ भाव दिसत आहेत. हे अभिनेते नेमके कोण आहेत? आणि ‘घबाडकुंड’मध्ये हे अभिनेते कोणती भूमिका साकारणार आहेत जाणून घेऊयात…
आपली प्रत्येक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत रुपेरी पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते शशांक शेंडे लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या आणि गूढ भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक भूमिकेला वेगळं वजन मिळतं, आणि त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल रसिकांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते.
‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा एका मांत्रिकाची असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा गूढ अभ्यास केलेला ‘बाबा’ अशी त्यांची ओळख आहे. चित्रपटातील त्यांच्या लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. संपूर्ण टक्कल, कपाळावर काळा टिळा, गळ्यात माळा आणि डोळ्यातील गूढ भाव या व्यक्तिरेखेला अधिकच भयावह बनवतात.
या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणतात, “ही भूमिका खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल.”
हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू काय आहे? हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट या सर्व प्रश्नांची उत्तरं देत प्रेक्षकांना थरारक आणि गूढ प्रवासावर घेऊन जाणार असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. या अभिनव संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
