Siddharth Chandekar : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेहमी त्याचे अनुभव शेअर करत असतो. वैयक्तिक आयुष्यासह चित्रपटातील अभिनयामुळे सिद्धार्थने मराठी घराघरात स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, झिम्मा व गुलाबजाम यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. स्त्रीप्रधान कथानक असलेल्या चित्रपटांमधील सिद्धार्थच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये आयुष्यामध्ये येणारे नैराश्य आणि कामामध्ये मिळणारे नकार यांवर भाष्य केले.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयुष्यातील विविध पैलूंवर भाष्य केले. यावेळी त्याने आयुष्यामध्ये येणारी बिकट परिस्थिती आणि आव्हानात्मक काळ यावर मत मांडले. अनेकदा अशा गोष्टी घडतात, जिथे आपल्याला नकार दिला जातो. अशा वेळी वाईट वाटणं साहजिक आहे. त्याशिवाय नंतर घडलेला माणूस समोर येत नाही, असे मत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मांडले आहे.

नकाराला कसे सामोरे जावे?

“प्रेरणा किंवा स्वतःला दिलेले मोटिव्हेशन मला सर्वांना सांगायला जास्त आवडत नाही. आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी जातो आणि समोरून जेव्हा नकार येतो तेव्हा कळत नाही की आता मी काय करू? माझ्याकडे हे दोनच एक्के होते आणि तेपण टाकून नकार आला, तर आता मी काय करू? असे प्रश्न आपल्याला पडतात. अशा वेळी वाईट वाटतं; पण ते वाटणंसुद्धा ठीक आहे”, अशी भावूक प्रतिक्रिया सिद्धार्थ चांदेकरने व्यक्त केली आहे.

आयुष्यात निराश वाटणंसुद्धा साहजिक आहे – सिद्धार्थ

त्याचबरोबर कधी कधी काहीच करावंसं वाटतं नाहीये, तर नको करू. हेसुद्धा ठीक आहे. काहीही न करणं किंवा निरुत्साहित असणं हे सगळं ठीक आहे. जेव्हा तु्म्ही यशस्वी व्यक्ती बनण्याचे प्रयत्न करत असता आणि ते होईपर्यंत सतत कटकट करीत राहता, तर हेसुद्धा ठीक आहे. पण, जर तू नेहमीच पूर्णवेळ कटकट करणारा किंवा निरुत्साही असणारा व्यक्ती बनलास, तर मग काही अर्थ नाही. पण कधीतरी आपण चांगलं नाहीये, असं वाटणं हे चालू शकतं. आपण कधी कधी सकारात्मकता किंवा सकारात्मक विचार यांचं खूप जास्त कौतुक करतो. पण, आयुष्यामध्ये कधीतरी कमी वाटणं किंवा निराश वाटणंसुद्धा साहजिक आहे, असे मत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मांडले.

सकारात्मकता मिळवण्यासाठी खूप काळ – सिद्धार्थ

सकारात्मकता पटकन मिळवता येत नाही. पैसे लवकर कमावता येतात. पण सकारात्मकता मिळवण्यासाठी किंवा ती साध्य करण्यासाठी खूप काळ लागतो, असे विचार अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मांडले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, त्याची भूमिका असलेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. लवकरच तो माया या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामध्ये तो मुक्ता बर्वेसह स्क्रीन शेअर करणार आहे. याचबरोबर मागील वर्षी अभिनेत्री माधुरी दीक्षितसह मिसेस देशपांडे ओटीटी सिरीजमध्ये सिद्धार्थने केलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा झाली.