Sunil Tawade Left Nonveg For His Mother : मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे सुनील तावडे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विनोदी, गंभीर आणि खलनायकी अशा विविध छटा असलेल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत. अभिनयातील सहजतेमुळे त्यांनी आपली प्रत्येक भूमिका पडद्यावर जिवंत केली आणि त्यामुळे ते घराघरात पोहोचले.
‘का रे दुरावा’ मालिकेतील त्यांची केतकरकाका ही भूमिका असो किंवा ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘ब्रह्मेकाका’ (अच्युत ब्रह्मे) असो… सगळ्याच भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच ते ‘बाई तुझा आशीर्वाद’ या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा एका नवीन भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
अभिनयामुळे चर्चेत राहणारे सुनील तावडे फॅमिली मॅन म्हणूनही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यांचा मुलगा शुभंकरसुद्धा याच इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून सक्रिय आहे. तावडे कुटुंबीयांचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून तावडे कुटुंबीयांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येते.
सुनील तावडे यांचे त्यांच्या आईवरसुद्धा तितकेच प्रेम होते. याच प्रेमापोटी त्यांनी आई गेल्यानंतर मांसाहार पूर्णपणे सोडून दिला. त्याबद्दल त्यांनी ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी सुनील तावडे म्हणाले, “माझी आई खूप चविष्ट आणि उत्कृष्ट मांसाहारी जेवण बनवायची, म्हणजे तिच्या हातची चव माझ्या आजही लक्षात आहे. ती खूप सुंदर जेवण बनवायची; पण मग ती गेल्यानंतर मी ठरवलं की, मला आता इथून पुढे मांसाहारी जेवण कुणाच्याच हातचं खायचं नाही. आई गेल्यानंतर १९८८ मध्ये मी मांसाहार पूर्णपणे सोडला. माझ्या एका मावशीच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा तिच्या पाचपरतावणाला मी जो मांसाहार खाल्ला तो शेवटचा. त्यानंतर मी मांसाहार पूर्णपणे सोडला. त्यानंतर मी योगा वगैरे सुरू केला. तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की, मांसाहार करायचा नसतो. ते आपल्या शरीरासाठी योग्य नाही. आता हे लोकांना पटणार नाही आणि मी ते पटवायला जातही नाही. काही लोक त्यावर वाद घालतील. त्यामुळे मला त्यात पडायचं नाही. मांसाहार सोडल्याचा मला फायदा झाला म्हणून मी ते पाळतो. त्यामुळेच मी १९८८ नंतर मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आहे.”
दरम्यान, सुनील तावडे यांच्या नव्या मालिकेबद्दल सांगायचे झाल्यास, ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेतून सुनील तावडेंबरोबरच अक्षता तळे, अर्णव वारियर, पुष्कर सरद, सतीश तांदळे व राघव वर्तक असे अनेक नवोदित कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
