Sunil Tawade Fitness Tips For Healthy Lifestyle : मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे सुनील तावडे. अभिनयासह सुनील तावडे स्वत:च्या फिटनेसकडेही लक्ष देतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी फिटनेसचं रूटीन शेअर केलं. या मुलाखतीत त्यांनी दारूविषयी चीड असल्याचे सांगितले. तसेच मांसाहार शरीरासाठी योग्य नसल्याचे सांगितले आहे.

आरपारला दिलेल्या मुलाखतीत सुनील तावडे म्हणाले, “मला दारूविषयी भयंकर चीड आहे. मी स्वत: दारू, सिगारेट, तंबाखू असं कोणतंच व्यसन करत नाही. मी मांसाहारसुद्धा करत नाही.” यानंतर सुनील तावडेंनी स्वत:चा फिटनेस मंत्रा दिला. यावेळी ते म्हणाले, “मी आयुष्यात स्वत:च्या स्वास्थ्याकडे कायम लक्ष दिलं. पैसे कमी मिळाले, नाही मिळाले किंवा कुणी बुडवले तरी हरकत नाही. पण मी स्वत:च्या स्वास्थ्याकडे कायमच लक्ष दिलं. सर्वांनीच आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं हेच माझं सांगणं आहे, कारण त्याशिवाय काही नाही. पैसे कमावल्यानंतरचं सुख अनुभवण्यासाठी तरी तुमचे स्वास्थ्य उत्तम असायला पाहिजे ना… सगळेच पैसे डॉक्टरांकडे जाऊन खर्च झाले तर मग काय उपयोग? हजार रुपये जरी कमावले तरी ते उपभोगण्यासाठी तरी तुमचं स्वास्थ्य उत्तम असणं आवश्यक आहे. हजार पैकी ५० डॉक्टरांकडे जाऊन खर्च झाले तर ठीक पण ९९९ रुपये तिकडे जात असतील तर काय उपयोग?”

यानंतर त्यांनी स्वत:चं फिटनेस रूटीन शेअर केलं. ते म्हणाले, “मी सकाळी चार वाजता उठतो. योगासने, प्राणायम करतो. आवाजाचे व्यायामसुद्धा करतो. ‘शाकुंतल’ नावाच्या नाटकासाठी तेव्हा ते शिकलो होतो, ते आताही करतो.”

Award Banner

पुढे त्यांना व्यायाम आणि योगासने करण्यात ते सातत्य कसं ठेवतात, असं विचारलं गेलं. त्यावर सुनील तावडे म्हणाले, “मलासुद्धा एखाद वेळेस रोज व्यायाम करणं शक्य होत नाही. कधी नाटकाचा दौरा लांबतो, कधी कधी शूटिंगला रात्री वेळ लागतो आणि पुन्हा सकाळी लवकरची शिफ्ट असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्यायाम करणं शक्य होत नाही. पण ठीक आहे. मी ते पुढच्या दिवशी भरून काढतो, आठवड्यातून किमान ३-४ दिवस तरी व्यायाम, योगासन आणि प्राणायम करतोच. पण मी रोज सहा तासांची झोप मात्र घेतोच घेतो.”

त्यानंतर ते म्हणाले, “मी आणखी एक गोष्ट ठरवली आहे, ती म्हणजे, रोज संध्याकाळी ६.३० वाजता जेवण करणे. ६.३० नंतर मी काहीच खात नाही. इंडस्ट्रीतसुद्धा अनेकांना हे माहीत आहे. ६.३० ला जेवल्यानंतर रात्रभर मी काहीच खात नाही. या इंडस्ट्रीत खूपच अनियमितता खूप आहे. कधीही प्रयोग लागतात, कधीही संपतात, शूटिंगच्या वेळासुद्धा नियमित नसतात. त्यामुळे मी जेवणाची ठरवलेली वेळ आणि ६ तासांची झोप हे निश्चित ठेवलं आहे.”