Vandana Gupte Alibaug Home : नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं नाव आज घराघरांत लोकप्रिय आहे. ‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’, ‘टाइमप्लीज’, ‘बकेट लिस्ट’, ‘अशी ही जमवा जमवी’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वंदना गुप्ते सध्या रंगभूमीवर ‘कुटुंब किर्रतन’ या लोकप्रिय मराठी विनोदी नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
‘कुटुंब किर्रतन’ नाटकाचे प्रयोग नुकतेच अलिबागमध्ये पार पडले. प्रयोग पार पडल्यावर या नाटकाची संपूर्ण टीम एका खास जागी पोहोचली होती. ते ठिकाण म्हणजे वंदना गुप्ते यांचं अलिबागमधील आलिशान घर. अभिनेत्रीचा अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. याठिकाणी संपूर्ण नाटकाच्या टीमला निमंत्रित करून वंदना गुप्तेंनी या सगळ्यांचा मोठ्या आनंदाने पाहुणचार केला. याचे खास फोटो संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘कुटुंब किर्रतन’ नाटकाची संपूर्ण टीम यावेळी वंदना गुप्तेंच्या घरी पोहोचली होती. एकत्र जेवण, स्विमिंग पूलमध्ये धमाल, अलिबागच्या निसर्गरम्य वातावरणाची झलक अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “काल ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाच्या कुटुंबाने अलिबागमध्ये मज्जा केली. वंदना गुप्तेंच्या बंगल्यावर मेजवानी होती. उत्तम आदरातिथ्य, चविष्ट जेवण…खरंच मजा आली. महत्त्वाचं म्हणजे अलिबागचा आमचा प्रयोग सुद्धा अगदी खणखणीत झाला.” संकर्षणने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘कुटुंब किर्रतन’ नाटकाबद्दल सांगायचं झालं तर, हे एक कौटुंबिक विनोदी नाटक आहे. या नाटकाचं लेखन संकर्षण कऱ्हाडेने केलं असून याचं दिग्दर्शन अमेय दक्षिणदास यांनी केलं आहे. यामध्ये संकर्षण कऱ्हाडे, अमोल कुलकर्णी, वंदना गुप्ते हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच या नाटकात तन्वी मुंडलेच्या जागी अभिनेत्री नुपूर चितळेची एन्ट्री झाली. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये या नाटकाचा ‘सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.
